जळगाव: चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात मध्यरात्री मोटार दरीत कोसळून चौघांचा जागीच मृत्यू, तर सात जण जखमी झाले. धुक्यामुळे आणि अंधाराचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून मोटार दरीत कोसळली. जखमींना तातडीने चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मृतांत पती-पत्नी, आठ वर्षांच्या मुलीसह महिलेचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील भाविक मोटारीने दर्शनासाठी गेले होते. तेथून ते परत येत असताना कन्नड घाटात मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या मोटारीला अपघात झाला. धुके व अंधाराचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटार दरीत कोसळली.

हेही वाचा… खडसे-महाजन वाकयुध्दातील ‘जोडेपुराण’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातात प्रकाश शिर्के (६५), शीलाबाई शिर्के (६०), वैशाली सूर्यवंशी (३५), पूर्वा देशमुख (आठ) यांचा जागीच मृत्यू, तर अनुज सूर्यवंशी (२०), जयेश सूर्यवंशी (१७), सिद्धेश पवार (१२), कृष्णा शिर्के (चार), रूपाली देशमुख (३०), पुष्पा पवार (३५), वाहनचालक अभय जैन (५०) हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मोटारीचा चक्काचूर झाला आहे.