नंदुरबार – शहरातील बस स्थानकात नेहमीप्रमाणे व्यवहार सुरु असताना अचानक पोलिसांना पाहताच एका युवकाने पळण्यास सुरुवात केली. काय चाललंय, कोणाला काहीच समजेना. पोलिसांनीही त्या युवकाचा पाठलाग सुरु केला. भर गर्दीत हा पाठशिवीचा खेळ रंगला. अखेर पोलिसांनी त्याला पकडलेच.

हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन शहरात मोकाट फिरत असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराच्या चित्रपटात दाखवितात, त्याप्रमाणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तब्बल १८ गुन्हे दाखल असलेल्या या सराईत गुन्हेगाराने बस स्थानक परिसरात पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. नंदुरबार शहर पोलिसांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला गुन्हेगार शहरात फिरत असल्याची माहिती मिळाली.

पावबा आखाडे (२७) असे या आरोपीचे नाव असून त्याला ८ मे २०२४ रोजी दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. नंदुरबार तालुक्यातील सिंदगव्हाणचा रहिवासी असलेला हा आरोपी आपल्या आठ साथीदारांसह संघटीत गुन्हे करायचा. या टोळक्यावर नंदुरबार जिल्ह्यातील शहर, उपनगर आणि तालुका अशा तीन पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल १८ गुन्हे दाखल आहेत.

हद्दपार करण्यात आलेले असतानाही पावबा आखाडे हा गुन्हेगार नंदुरबार शहरात मोकाट फिरत असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांना मिळताच त्यांला पकडण्यासाठी त्यांनी एक पथक रवाना केले. या पथकाला आखाडे हा बस स्थानकसारख्या अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांचे पथक बस स्थानक परिसरात दाखल झाले.

पोलिसांच्या पथकाला पाहताच आरोपींने पळ काढला. त्याने पळ काढताच पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेवून शहर पोलीस ठाण्यात आणले. त्याच्यावर हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली. आगामी गणेश उत्सव आणि इतर सण पाहता नंदुरबार पोलिसांची आता हद्दपार आणि अट्टल आरोपींवर करडी नजर राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिबंधात्मक कारवाई

नंदुरबार पोलिसांनी शहादा पोलीस उपविभागातंर्गत ६३ व्यक्तींवर प्रतिंबंधात्मक कारवाई केली आहे. नंदुरबार जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी शहादा उपविभागीय कार्यालयात यासंदर्भात बैठक घेतली. संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसींचे उल्लंघन झाल्यास संबंधीतांवर दंडात्मक कारवाई तसेच तुरुंगवास देखील होण्याची शक्यता आहे. शहादा परिसरात एकाच दिवशी पोलिसांनी ६३ जणांवर केलेल्या कारवाईने उपद्रवींना जरब बसणार आहे.