लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल वन परिक्षेत्रातून खैराची वाहनातून तस्करी करण्याचा प्रयत्न वन विभागाच्या पथकाने १८ किलोमीटर पाठलाग करून हाणून पाडला. वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात पथकाला यश आले. अंधाराचा फायदा घेत संशयित वाहन चालक पळून गेला.

वनपाल महादू मौळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. हरसूल वनपरिक्षेत्रातील वनपाल महादू मौळे, पद्माकर नाईक, सुनील टोंगारे हे रायते क्षेत्रात कर्मचाऱ्यांसह रात्रीची गस्त घालत असतांना एका वाहनाविषयी त्यांना संशय आल्याने त्यांनी चालकास हटकले असता त्याने वाहन सुरु करुन पळ काढला. काकडवळण ते मुळवड असा १८ किलोमीटर पथकाने त्या वाहनाचा पाठलाग केला. मुळवडजवळील बारीमाळचा चढ वाहन चढत नसल्याने चालकाने वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. पथकाने वाहनांची तपासणी केली असता खैराचे ९४ नग आढळून आले. वाहनासह पाच लाख २५ हजाराचा मुद्देमाल वनविभाकडून हस्तगत करण्यात आला.

आणखी वाचा-जळगाव: एरंडोल तालुक्यात खासगी बस नाल्यात कोसळून दोन ठार; १२ प्रवासी जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक पश्चिम भागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक अनिल पवार, त्र्यंबकेश्वर वन परिक्षेत्र अधिकारी राजेश पवार, हरसूल वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल महादू मौळे, पद्माकर नाईक, सुनील टोंगारे, वनरक्षक मंगेश गवळी, मनोहर भोये, रामदास गवळी, अमित साळवे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.