जळगाव – महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे राज्यातील शेतकरी शिल्लक राहील की नाही, याची भीती आता वाटते आहे. कारण सरकारने तशी व्यवस्थाच करून ठेवली आहे, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी येथे केली.
राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये सोमवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्याच धर्तीवर जळगावमध्येही बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या माध्यमातून काळ्या फिती लावून तसेच काळे कपडे घालून सरकारचा निषेध करण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करून केळी, कापूस, कांदा, मका, ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. शिवसेनेचे (उद्वव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील आणि बच्चू कडू यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. या प्रसंगी शेतकऱ्यांसमोर बोलताना माजी खासदार पाटील तसेच बच्चू कडू यांनी महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर सडकून टीका केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यभर दौरा करत असताना, कोणत्याच जिल्ह्यातील शेतकरी नफ्यात म्हणजे सुखी असल्याचे दिसून आला नाही. सर्व शेतकरी सरकारने लुटल्यामुळे कर्जबाजारी झाले आहेत, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.
सरकारपेक्षा शेतकऱ्यांचा मला जास्त राग येतो. कारण, केळीचा भाव ३०० रूपयांपर्यंत घसरला आहे. कापसाला सहा हजार आणि सोयाबीनला ३४०० रूपयांपेक्षा जास्त भाव नाही. ज्वारी खरेदी वेळेवर केली जात नाही. बियाणे धड चांगले मिळत नाही. किटकनाशकांमध्ये घोटाळा आणि रासायनिक खतांमध्ये भेसळ असल्याने शेतकरी सर्व बाजुंनी होरपळला आहे. तरीही शेतकरी गूपचूप का आहे आणि त्यांना सरकारचा राग का येत नाही, असे प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केले. १०० रूपये कमी-जास्त झाले तर रिक्षावाल्याशी आपण भांडतो. ५० रूपये एखाद्या मजुराने जास्त मागितले तर त्याच्याशी वाद घालतो. एखादी वस्तू खरेदी करताना किती भाव करतो. आणि तिकडे सरकारकडून क्विंटलमागे तीन हजार रूपयांनी लुटले जाते. ही लूट आजच नाही तर कित्येक वर्षांपासून होत आहे. तरी शेतकऱ्यांना सरकारचा राग येत नाही, याकडे बच्चू कडू यांनी लक्ष वेधले.
तसे पाहिले तर सरकार फार दोषी नाही, शेतकरी जास्त दोषी आहेत. शेतकरी काही बोलत नसल्याने सगळी व्यवस्था बदल्याचे दिसत आहे. वैयक्तिक माझ्यावर ३५० गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी चार गुन्ह्यात शिक्षा देखील झाली आहे. खुद्द माझ्या आईने मला शेतकरी आणि अपंगांसाठी लढताना हजार गुन्हे दाखल झाले तरी घाबरू नको. आणखी जोमाने लढ, असे सांगितले आहे. मात्र, तुम्ही एक गुन्हा दाखल होण्यासाठी घाबरत आहात. काय फरक पडणार आहे. नाही नेपाळसारखे करू, पण त्यांच्या घरापर्यंत तर जाऊ. तुमच्या जिल्ह्यातील संकटमोचक फक्त पक्षासाठी आहेत, ते जनतेसाठीच नाहीत. हे सगळे गुलाम आहेत. एकेकाळी जोरात आवाज करणाऱ्यांच्या खालूनही आता आवाज निघत नाही, असा टोला त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांना हाणला. यावेळी जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.