नाशिक : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची ३२५ वी जयंती सोमवारी सिन्नर तालुक्यातील डुबेरे या त्यांच्या जन्मगावी मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. पुतळा पूजनासह वाद्यवृंदाच्या साथीने मानवंदना देण्यात आली. गावात रामदंडींनी शानदार संचलन केले. बर्वे वाड्यातील पुतळ्यास सशस्त्र पथकाने सलामी दिली.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे नाशिक जिल्ह्यातील असूनही अनेकांना त्यांची तसेच त्यांच्या युद्धातील कामगिरीची माहिती नाही. ती व्हावी, या उद्देशाने त्यांच्या मूळगावी संस्थेने या कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रारंभी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करत मानवंदना देण्यात आली. यावेळी सरपंच पावसे, श्रीमंत बाजीराव पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, थोरले बाजीराव पेशव्यांचे मामा मल्हारराव बर्वे यांच्या नवव्या पिढीतील चंद्रशेखर बर्वे, निखिल बर्वे आदी उपस्थित होते. भोसला सैनिकी महाविद्यालयातर्फे प्राचार्य मेजर विक्रांत कावळे (निवृत्त), बँड मास्टर गुरुंग , सहायक अश्व प्रशिक्षक अभिषेक नवले आणि सुमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून वाद्यवृंदासह रामदंडींनी संचलन केले. यात १२५ रामदंडीने सहभाग नोंदवला. शिस्तबध्द संचलनाने डुबेरेवासीयांचे लक्ष वेधून घेतले. गावात प्रथमच अशा पध्दतीचा कार्यक्रम झाल्याने सर्वत्र उत्साह दिसला. डुबेरेवासियांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेचे बँड पथक, नंतर २० विद्यार्थ्यांचे सशस्त्र पथक (गार्ड) आणि नववीच्या दोन तुकड्या सर्वांचेच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.
फेरीत श्रीमंत बाजीराव पेशवे पतसंस्थेच्या ठिकाणी थोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. येथेही रामदंडींनी मानवंदना दिली. त्यानंतर सर्वजण प्रत्यक्ष बर्वे वाड्यात गेले. दीड एकर क्षेत्रात असणाऱ्या बर्वे वाड्याच्या प्रांगणात थोरले बाजीराव यांचा अश्वारुढ पुतळा आहे. या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. सशस्त्र पथकाने सलामी दिली. भोसलाच्या रामदंडीनी प्रत्यक्ष जन्मखोलीचे दर्शन घेतले. हिंदवी साम्राज्याचा झेंडा अटकेपार रोवणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे अजिंक्य योद्धा होते. अलीकडच्या काळात अजेय वीर विस्मरणात जात आहेत. त्यामुळे अशा वीर योद्ध्यांचा कधीही विसर पडू नये, अटकपासून कटकपर्यंत झेंडा रोवणाऱ्या योद्धाची कायमस्वरुपी आठवण रहावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्राचार्य कावळे यांनी सांगितले.