आरोग्य सेवा प्रभावीपणे देणे, वेगवेगळ्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे या उद्देशाने आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध घटकांना राज्य शासनाच्या वतीने ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, क्षेत्रीय कर्मचारी यांना प्रोत्साहनासाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कार निवडीसाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. पुरस्काराचे स्वरूप रुपये एक लाख, सन्मानचिन्ह असे आहे.

स्वयंसेवी संस्था, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे तीन डॉक्टर, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे पाच कर्मचारी आणि अन्य घटक यांना गौरविण्यात येणार आहे. यासाठी लवकरच प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष म्हणून आरोग्य सेवा आयुक्त काम पाहणार आहेत. सदस्य म्हणून आरोग्य सेवा संचालक मुंबई आणि पुणे, मुंबई विभागत अतिरिक्त अभियान संचालक, आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक पुणे, मुंबई आरोग्य सेवा तांत्रिक विभाग आणि रुग्णालय विभाग सहसंचालक, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक, पुणे आरोग्य सेवा उपसंचालक, वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त शासकीय अधिकारी काम पाहतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक पुरस्काराच्या वर्गासाठी वेगळे निकष असतील. इच्छुकांचे प्रस्ताव हे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या शिफारशीने राज्य समितीवर सादर करण्यात येतील. यामध्ये डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार नाही.