लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या निमित्ताने शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. सभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिक पोलीस सतर्क झाले आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहर क्षेत्र नो ड्रोन फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे. याबाबत आयुक्तांनी आदेश दिले आहेत.

अलीकडील काळात घातपातासाठी ड्रोनचा वापर करण्यात येऊ लागला आहे. ड्रोनच्या माध्यमातून हल्लेही करण्यात येत आहेत. भारतीय विमानतळ परिसरातही ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला आहे. ड्रोनच्या माध्यमातून अमली पदार्थाची तस्करी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कार्यक्षेत्रातील संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र नो ड्रोन फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

आणखी वाचा-मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनात घबाड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील संपूर्ण परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर्स, हॉटएअर बलुन्स, मायक्रोलाईट,एअर क्राफ्ट आदी तत्सम प्रकारे दहशतवाद्यांकडून हल्ल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आयुक्तालयाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या आहेत. पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय संपूर्ण परिसरात कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॉट एअर बलुन्स आदींचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील ड्रोन चालक आणि मालक यांनी शहर परिसरात सहा ते आठ नोव्हेंबर या कालावधीत ड्रोन उड्डाण करू नयेत, असे नमूद करण्यात आले आहे. नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या छायाचित्रिकरणासाठी परवानगीबाबत संपूर्ण अधिकार पोलीस आयुक्तांनी राखून ठेवले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त कर्णिक यांनी दिला आहे.