जळगाव : केळीच्या उत्पादन खर्चात अलीकडच्या काळात विविध कारणांमुळे मोठी वाढ झाली आहे. त्यातच अपेक्षित बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वसूल होणे सुद्धा कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यातही बाजारभावाची अनिश्चितता कायम राहण्याच्या शक्यतेने अनेकांनी यंदा केळी लागवडीची जोखीम पत्करणे टाळल्याचे दिसून येत आहे. परिणामी, जवळपास २० टक्क्यांनी केळी लागवडीचे क्षेत्र घटण्याची चिन्हे आहेत.

जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध असून त्याला केळीची राजधानी अशी ओळख मिळाली आहे. जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर केळीची वर्षभरात लागवड केली जाते. त्यापैकी सुमारे ८० टक्के क्षेत्र निर्यातक्षम जी ९ टिश्यूकल्चर जातीच्या केळी लागवडीखाली येते. उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण आणि सातत्य यामुळे जळगावचे केळी उत्पादक महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या एकूण केळी उत्पादनात महत्त्वपूर्ण वाटा उचलतात.

केळी लागवडीमुळे हजारो शेतकरी, मजूर, व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगाशी संबंधित लोकांना रोजगार आणि उत्पन्नाचे स्थिर साधन उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात केळी लागवड मुख्यतः दोन हंगामांत केली जाते. शेतकरी मार्च ते जुलै या कालावधीत मृगबाग प्रकारातील केळीची लागवड करतात, तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कांदेबाग प्रकारातील लागवड केली जाते.

कांदेबाग केळीची काढणी साधारणपणे दिवाळीच्या सुमारास सुरू होते, तर मार्च–एप्रिलमध्ये लागवड केलेली नवती केळी उन्हाळ्याच्या प्रारंभी काढणीसाठी तयार होते. या दोन्ही हंगामांमुळे शेतकऱ्यांना वर्षभर केळी उत्पादनाचे नियोजन करता येते आणि बाजारातील मागणीप्रमाणे पुरवठा संतुलित ठेवण्यास मदत होते. मात्र, अलिकडील काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता संबंधित सर्व शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामानामुळे केळी लागवड आणि बागा सांभाळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, त्यामुळे एकूण उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. उत्पादन घटले असले तरी बाजारात केळीचे दर मात्र वाढलेले नाहीत. उलट व्यापारी आणि मध्यस्थ यांच्याच हातात भाव ठरविण्याची सूत्रे गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अधिकच वाढले आहे. अनेक केळी उत्पादक शेतकरी वाढत्या कर्जबाजारीपणाच्या चक्रात अडकले आहेत.

जिल्हाभरातील लागवडीचे एकूण क्षेत्र लक्षात घेता रावेरसह यावल, मुक्ताईनगर तालुक्यांत प्रामुख्याने मृगबाग केळी लागवड केली जाते. तर जामनेरसह भुसावळ, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जळगाव, पाचोरा, भडगाव तालुक्यांत कांदेबाग केळी लागवड केली जाते. सध्या कांदेबाग केळी लागवडीची वेळ असल्याने शेतकऱ्यांची त्यादृष्टीने लगबग देखील सुरू आहे. मात्र, पूर्वीचा उत्साह संबंधित शेतकऱ्यांमध्ये आता राहिलेला नाही. अनेकांनी केळी लागवडीचे क्षेत्र कमी केले आहे. काहींनी केळी लागवड न करता अन्य पिकांचा विचार करण्यास सुरूवात केली आहे. परिणामी, कांदेबाग केळी लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. बाजारभावाची निश्चितता न राहिल्याने लागवडीची जोखीम पत्करून डोक्यावर आणखी कर्जाचे ओझे वाढविण्यास कोणीच तयार नाही. त्यामुळे दरवर्षी केळी लागवडीत दिसून येणारा उत्साह यंदा बराच कमी झाल्याचे चित्र आहे.

गेल्या काही महिन्यांपासून केळीला वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित बाजारभाव मिळालेले नाहीत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी यंदा कांदेबाग केळी लागवड कमी केली आहे. – रवींद्र निकम (शेतकरी, माचला, ता. चोपडा, जि. जळगाव)