जळगाव : केळी लागवडीसह उत्पादनात जिल्हा अग्रस्थानी असला, तरी अलीकडे विविध कारणाने उत्पादन खर्च दुपटीने वाढला आहे. त्या तुलनेत केळीला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणेही आता मुश्किल झाले आहे. अनेक शेतकऱ्यांवर मोठ्या कष्टाने पिकवलेली केळी नाईलाजाने जनावरांपुढे टाकण्याची वेळ आली आहे.
प्रतिकूल हवामानामुळे केळीच्या बागा सांभाळणे दिवसेंदिवस जिकिरीचे होत आहे. तशात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे उभे पीक नष्ट होण्याचे प्रकार वाढल्याने एकूण केळी उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे, उत्पादन कमी झाले तरी बाजारात केळीचे दर वाढलेले नाहीत; उलट व्यापार्यांच्या आणि मध्यस्थांच्या हातात केळीचे दर ठरविण्याचे अधिकार गेल्याने शेतकऱ्यांचा तोटा वाढतो आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना हवामानावर आधारीत फळपीक विम्यासह शासनाकडून जाहीर होणाऱ्या मदतीचा इतके दिवस आधार होता. मात्र, फळपीक विमा व शासनाकडून जाहीर होणाऱ्या मदतीची कोणतीच शाश्वती आता राहिलेली नाही. नुकसानभरपाईची मदत उशिरा मिळते आणि ती देखील अपुरी असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा शासनावरील विश्वास कमी झाला आहे. अनेक केळी उत्पादक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत.
या संकटातून केळी उत्पादक शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने दीर्घकालीन धोरण राबवणे आवश्यक आहे. केळीसाठी उत्पादन खर्चानुसार हमीभाव निश्चित करणे, शीतगृह व साठवण सुविधा वाढवणे, प्रक्रिया उद्योगांना चालना देणे आणि जलसंधारणावर भर देणे गरजेचे आहे. तसेच, बाजारातील पारदर्शक व्यवहार व थेट विक्रीची संधी मिळाल्यास शेतकऱ्यांना योग्य दर मिळू शकतील. एकूणच, केळी उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती सावरण्यासाठी तातडीची आणि परिणामकारक उपाययोजना आवश्यक आहे. त्यादृष्टीने शासन व लोकप्रतिनिधींनीनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. सद्यःस्थितीत रावेर बाजार समितीत केळीला किमान ६५० आणि कमाल ८०० रूपये प्रति क्विंटलचा भाव आहे. तर मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीत ४५१ ते ५६१ रूपये प्रति क्विंटलचा भाव दर्जेदार केळीला मिळत आहे. अपवादात्मक परिस्थितीत निर्यातीच्या केळीला बऱ्यापैकी म्हणजे ७०० ते ८०० रूपयांचा भाव व्यापारी देताना दिसत आहेत.
अर्थात, केळी निर्यातीचे प्रमाण खूपच नगण्य आहे. नैसर्गिक आपत्तीच्या संकटांना तोंड देऊन उत्पादन घेणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या संकटाचा मोठा सामना करावा लागत आहे. शहरांमध्ये डझनाला ३० ते ४० रुपयांप्रमाणे केळी विकली जात असताना, शेतकऱ्यांकडून व्यापारी तीन ते चार रूपये प्रति किलोच्या भावाने केळी खरेदी करताना दिसत आहेत. निर्यातक्षम केळीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. लागवडीपासून ते काढणीपर्यंत केळीच्या एका घडासाठी १०० ते १२० रूपये आणि क्विंटलला ७०० ते ८०० रूपयांचा उत्पादन खर्च सहजपणे येतो. सध्याचे निच्चांकी दर लक्षात घेता शेतकऱ्याला सरासरी २० किलोच्या घडापासून जेमतेम ५० ते ६० रूपये मिळताना दिसत आहेत. त्यातही केळीचा घड शेतातून बांधावर वाहून नेण्यासाठी प्रति घड १० रूपये मजुरीचा खर्च करावा लागत आहे. शेतापासून रस्ता लांब असल्यास मजुरीचा खर्च २० रूपयांपर्यंतही जातो.
बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने उत्पादन खर्च वसूल होत नसताना, व्यापारी केळी काढणीसाठी नकार देत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या कष्टाने पिकवलेली केळी जनावरांपुढे टाकण्याची वेळ आली आहे. – मोहन सोनवणे (शेतकरी, करंज, ता. जि. जळगाव)
