जळगाव – शहरातील खड्डेमय व धूलिमय रस्ते, साफसफाईचा अभाव, दिवाबत्ती, तुंबलेल्या गटार यांसह विविध नागरी सोयी-सुविधांंसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे सोमवारी दुपारी महापालिका प्रशासन, आमदारांच्या विरोधात भजने गात आंदोलन करण्यात आले.आंदोलन शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगरमधील रेल्वे उड्डाणपुलाजवळ करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी आंदोलकांनी त्यांच्या मोटारीला घेराव घालून नागरी सोयी-सुविधांबाबत प्रश्‍नांचा भडिमार केला. आमदार भोळे यांनी, संबंधित कामांच्या निविदाप्रक्रिया सुरू असून, कामे लवकरच मार्गी लागतील. जेथे निकृष्ट दर्जाची कामे होत असतील तर तक्रार करा. यासंदर्भात आयुक्तांसमवेत बैठक घेणार असल्याची ग्वाही दिली.

जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष लाडवंजारी, युवक महानगराध्यक्ष रिकू चौधरी, शहर संघटक राजूभाऊ मोरे, महानगर जिल्हा उपाध्यक्ष भगवान सोनवणे, अकिल पटेल, महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा मंगला पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. राज्य सरकार व आमदार भोळेंच्या विरोधात विविध भजने गात असल्यामुळे जळगावकरांचे लक्ष वेधले गेले. त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबाही झाला होता.

हेही वाचा >>>धुळ्याजवळ गुटख्याची वाहनातून वाहतूक; ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पाटील यांनी महापालिका प्रशासनासह राज्य सरकारवर टोलेबाजी केली. महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे. काही भागांत कार्यारंभ आदेश नसतानाही रस्ते केले जात आहेत. साफसफाईही नियमित केली जात नसल्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारकांना मणक्यांच्या विकारांनी बेजार केले असल्याचे त्यांनी सांगितले.