चारुशीला कुलकर्णी
घरटय़ांचे अधिक नुकसान
नाशिक : दोन दिवसापासून जिल्ह्य़ात सुरू झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे ठिकठिकाणी घरांचे छप्पर उडणे, फळबागा उद्ध्वस्त होणे, विजेच्या तारा तुटणे, वृक्ष उन्मळून पडणे असे प्रकार होत असल्याने मोठय़ा प्रमाणावर वित्तीय हानी झाली असतांना पर्यावरण चक्रोवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वादळी वारा आणि पावसामुळे झाडांवरील घरटी पडून पक्ष्यांचा निवाराच हिरावला गेला आहे. अनेक पक्षी जखमी झाले आहेत.
जूनच्या पहिल्या आठवडय़ात पावसाचे आगमन होते. पावसापासून पिलांचे संरक्षण व्हावे यासाठी शिंपी, बुलबुल, तांबट, घारी, सूर्यपक्षीसह अन्य पक्ष्यांनी घरटी विणण्यास सुरूवात केली आहे. बहुतांश पक्ष्यांची घरटी पूर्णपणे बांधून झाली असतांना तर, काहींचे बांधण्याचे काम सुरू असतांना शनिवारपासून जिल्ह्य़ात वादळी वारे वाहू लागले. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे मुळासकट उन्मळली. काही ठिकाणी फांद्या मोडल्या. या पडझडीत पक्ष्यांची घरटी जमीनदोस्त झाली. अंडी फु टली. काही पक्षी जखमी झाले. घरटी न करता आपली अंडी इतरत्र ठेवणाऱ्या कबुतरांची अंडीही या वाऱ्यात फुटली.
या संपूर्ण घडामोडीत वन विभागाची भूमिका महत्त्वाची असतांना अजूनतरी या विभागाकडून कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही. वनविभागाच्या मदत केंद्रावर ही व्यवस्था नाही. पक्षीमित्र किंवा पर्यावरणप्रेमींवर ही जबाबदारी देण्यात येत आहे.
मागील दोन दिवसात मोठय़ा प्रमाणावर पक्ष्यांची घरटी जमीनदोस्त झाली. काही पक्षी जखमी झाले तर काहींचा जीव गेला. उलट अभयारण्य परिसरात पक्षी सुरक्षित राहिले. घरटी नामशेष झाल्याचा परिणाम लवकरच कळेल. मात्र वनविभागाने यावर ठोस काम करणे गरजेचे आहे.
-प्रा. आनंद बोरा (पर्यावरणमित्र)
हे पक्षी घरटी बांधतात
उन्हाळा संपत आला की बुलबुल, सूर्यपक्षी, होलो, शिंपी, घुबड, घार, कावळा, साळुंकी, पोपट, दयाळ, पाकोळी, चिमणी, शराटी, कबुतर, भारद्वाज, तांबट पक्षी घरटी करण्यास सुरूवात करतात. साधारणत मे आणि जूनमध्ये घरटी बनविण्यास सुरूवात होते. वाडा, चाळी नष्ट होत असल्याने पक्ष्यांना स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. यामुळे शहरातील लहानमोठय़ा कुंडीत, गच्ची, सज्जात पक्षी घरटी बनवतात. यामध्ये जास्वंद, अशोक, निलगिरी, पिंपळ, सिल्व्हर ओक किंवा अन्य दाट वेलीत ही घरटी केली जातात. नागरिक गच्चीत खाद्य आणि पाणी ठेवत असल्याने त्याच परिसरात घरटी करतात. या घरटय़ांना वादळाचा फटका बसला. यामध्ये अनेक पक्षी जखमी झाले.