नाशिक – ढासळती कायदा व सुव्यवस्था, हत्या सत्र, टोळक्यांचा धुडगूस, फोफावलेले अवैध धंदे, महिला सुरक्षेचा अभाव, यासह विविध प्रश्नांकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चातून लक्ष वेधण्यात आले. यावेळी पंचवटीतील नांदूर नाका येथे किरकोळ वादातून टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत राहुल धोत्रे या युवकाचा मृत्यू झाल्याचा विषय मांडला गेला. या प्रकरणातील संशयित भाजप माजी नगरसेवक उद्धव निमसे हे अद्याप फरार आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्यावतीने शहर व ग्रामीण भागातील विविध प्रश्नांकडे काढण्यात आलेल्या मोर्चात ठाकरे गटाचे नेते खा. राऊत. मनसेचे बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, ठाकरे गटाचे खा. राजाभाऊ वाजे आदी सहभागी झाले होते.
मनसेचे दिनकर पाटील, ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते आदी पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निेवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन चर्चा केली. यावेळी नांदूरनाका हत्या झालेल्या राहुल धोत्रे याचा भाऊही उपस्थित होता. मोर्चात धोत्रे हत्या प्रकरणातील फरार संशयित भाजप माजी नगरसेवक उद्धव निमसे याचा विषय खा. राऊत यांनी मांडून पोलीस यंत्रणेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टिकास्त्र सोडले.
नांदूर नाका परिसरात २२ ऑगस्ट रोजी मारहाणीची ही घटना घडली होती. टोळक्याने लाकडी दांडके, हत्यारांनी अजय कुसाळकर (२७) आणि राहुल धोत्रे यांच्यावर हल्ला केला होता. उपचारादरम्यान राहुल धोत्रे या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात उद्धव निमसे यांच्यासह अन्य काही जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
काही जणांना पोलिसांनी अटक केली. परंतु, संशयित माजी नगरसेवक उद्धव निमसे अजूनही फरार आहे. अलीकडेच उच्च न्यायालयाने निमसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याचे वृत्त समोर आले होते. धात्रे या युवकाची हत्या सत्ताधारी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यानी केला असल्याचा आरोप खा. राऊत यांनी केला. कुठे गेला उद्धव निमसे, असा प्रश्न करीत त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले.
आंदोलन करणारे आमचे कार्यकर्ते पोलिसांना बरोबर मिळतात, परंतु, भाजपचा माजी नगरसेवक मिळत नाही. भाजपचा नगरसेवक हत्या करून फरार होतो. फरार असताना तो मंत्री गिरीश महाजन यांना बंगल्यावर भेटतो. त्याला कोण वाचवतेय, संशयित निमसे कुठल्या सरकारी बंगल्यात लपलाय. असे प्रश्न करीत त्यांनी गृहमंत्र्यांना लक्ष्य केले. नाशिकमध्ये जमिनी लुबाडणे, लूटमार आदींसाठी ४० हत्या झाल्याकडे खा. राऊत यांनी लक्ष वेधले.