जळगाव – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत बहुमत मिळविण्यासाठी कोणी कसाही असला तरी त्याला भाजपमध्ये घ्या. पक्षात घेऊन विरोधात बोलणाऱ्यांचे तोंड एकदाचे बंद करा, असा अजब सल्ला मंत्री गिरीश महाजन भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे.
जामनेरमध्ये सेवा पंधरवडा २०२५ च्या नियोजनासंदर्भात भाजप जळगाव पूर्व जिल्ह्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा आणि स्वच्छतेच्या मूल्यांवर आधारित उपक्रमांचे नियोजन तसेच अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा केले गेली. दरम्यान, या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मंत्री महाजन यांनी विरोधकांना फोडून भाजपमध्ये प्रवेश देण्याचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळविण्याचा सल्ला भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. यावेळी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, भाजप जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव शहर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढल्या जातील. काही ठिकाणी अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढला जाईल. मात्र, जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, जळगाव महापालिका तसेच एकही नगपालिका शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस या पक्षांना मिळणार नाही, याची खबरदारी पक्षाच्या सर्वांनी घ्यावी. कोणी दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असेल तर त्याला जरूर घ्या. याला घेऊ नका त्याला घेऊ नका, असे करत बसू नका. घ्या पेक्षा घेऊ नका म्हणणारे अलिकडे पक्षात जास्त झाले आहेत. एखादा विरोधात राहुन शिव्या देतो म्हणून तर त्याला आपल्या पक्षात घ्यायचे आहे. त्याचे तोंड बंद करण्यासाठी तोच एक उपाय आहे. तो कसा पण असला तरी कामाचा माणूस असतो. त्याचेही मतदारांमध्ये वर्चस्व असते. त्यामुळे गावपातळीवरील सामान्य कार्यकर्ता देखील भाजपशी जुळला पाहिजे, याकडे मंत्री महाजन यांनी पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
राज्याच्या मंत्रिमंडळातही कितीतरी लोक भाजपवर टीका करणारे होते. पण आज ते भाजपकडे आले आहेत. जो प्रामाणिकपणे काम करेल त्याला पक्षात किंमत आहे. मात्र, फोटोबाजी करणाऱ्याला भाजपमध्ये किंमत नाही. कार्यकर्ता लहान का असेना त्याला पक्षात घ्या. कारण तो १०-२० मतांना महाग नसतो. किमान पक्षात घेतल्यावर तो आपल्याला मिळणारी मते दुसरीकडे फिरवणार तरी नाही. विरोधक भाजपमध्ये आल्यानंतर माझे कसे होईल आणि त्याला तिकीट मिळेल का, असा विचार करू नका. पक्षात झोकून काम करणाऱ्यांना मोठी संधी आतापर्यंत मिळाली आहे. ज्यामध्ये रावेरचे भाजप आमदार अमोल जावळे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, जळगावचे आमदार सुरेश भोळे आणि खासदार स्मिता वाघ यांचा समावेश असल्याचे मंत्री महाजन यांनी नमूद केले.