मालेगाव : मालेगाव शहरात गेल्या वर्षभरापासून बनावट जन्म दाखले प्रकरण गाजत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पहिल्यांदा हे प्रकरण उघडकीस आणले. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या हे वारंवार मालेगाव येथे येत आहेत. मंगळवारी सोमय्या हे पुन्हा मालेगावात येऊन गेले. या भेटीत अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, महापालिका आयुक्त रवींद्र जाधव व तहसीलदार विशाल सोनवणे यांच्याशी त्यांनी बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या विषयावर चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

मालेगावात जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आल्यानंतर एकूण ३२७३ जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेली ही प्रमाणपत्रे परत घेण्याची कार्यवाही महसूल व पालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. मात्र,ज्यांची जन्म प्रमाणपत्रे रद्द केली गेली,त्यातील सुमारे ५०० लोक सद्यःस्थितीत गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधितांच्या पत्त्यावर तपास केल्यावर त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने रद्द झालेली ही प्रमाणपत्रे अद्याप परत मिळू शकली नाहीत. तसेच त्यातील दोन डझन लाभार्थी भारत देश सोडून पळून गेल्याचा संशय आहे. त्यामुळे हे लोक कोण आहेत, असा प्रश्न उपस्थित करत हे लोक स्लीपर सेल, दहशतवादाशी संबंधित किंवा बांगलादेशी,रोहिंगे असण्याचा संशय बळावत असल्याने याप्रकरणी ४८ तासाच्या आत मालेगाव पोलिसात आणखी एक गुन्हा दाखल होईल, असा दावा सोमय्या यांनी केला.

जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आलेल्या लोकांची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. आधार कार्ड प्राधिकरणाने त्यांचे आधार कार्ड रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच गुन्हे दाखल झाले असून महसूल व महापालिकेतील ५० हून अधिक सरकारी अधिकारी,कर्मचाऱ्यांना तसेच संबंधित लाभार्थी, दलाल यांना आरोपी बनविण्यात आले असल्याचे सोमय्या यांनी नमूद केले. मालेगावातून बनावट जन्म प्रमाणपत्रे प्राप्त करुन जे दोन डझनहून अधिक लाभार्थी भारताबाहेर पळाले असण्याची शक्यता आहे, त्यांचे कोणतेही कागदपत्रे आढळून येत नाही. त्यातील काहींनी जन्म प्रमाणपत्रांच्या आधारे पासपोर्ट देखील प्राप्त केले आहेत. त्यामुळे त्यांना ही जन्म प्रमाणपत्रे कशी दिली गेली व हे लोक नेमके कोण आहेत, याचाही तपास होणे आवश्यक असल्याचे सोमय्या म्हणाले.

तसेच जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आल्यानंतर ५०० हून अधिक लोकांचे गायब असणे आणि दोन डझन लोकांचे देशाबाहेर पळून जाणे, हा अत्यंत गंभीर प्रकार असून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित तो मुद्दा ठरतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे या विषयावर आणखी एक नवीन गुन्हा दाखल करण्यासंदर्भात महसूल,पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे सोमय्या यांनी सांगितले. सोमय्या यांच्यासोबत भाजपचे मालेगाव महानगरप्रमुख देवा पाटील, संदीप पाटील, ॲड योगेश निकम आदी उपस्थित होते.

नंदुरबारमधील संस्थेबद्दलही संशय..

सोमय्या हे मालेगाव येथून नंदुरबारच्या अक्कलकुवा येथे रवाना झाले. येथून रवाना होण्यापूर्वी अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया या शिक्षण संस्थेबद्दलही त्यांनी संशय व्यक्त केला. आदिवासी क्षेत्रात असलेल्या या ठिकाणी वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध शाखांचे शिक्षण दिले जात आहे. तसेच मदरशाच्या माध्यमातूनही तेथे धार्मिक शिक्षण दिले जात आहे. या ठिकाणी १४ हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात २०० ते ३०० एवढेच स्थानिक आदिवासी विद्यार्थी आहेत. अन्य सर्व विद्यार्थी हे उत्तर प्रदेश, झारखंड,पश्चिम बंगाल अशा बांगलादेशच्या शेजारील राज्यांमधील आहेत. या संस्थेचा कारभार संशयास्पद असून तेथे कागदपत्रे बोगस आढळून आली आहेत. या संस्थेला परदेशातून मिळणाऱ्या एक हजार कोटींच्या देणग्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत संस्थेचा ‘एफसीआरए’ परवाना रद्द झाल्याची माहिती देखील सोमय्या यांनी दिली.