नाशिक : केंद्राने सहकाराला महत्व दिले असून या क्षेत्राबाबत सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. परंतु, महाराष्ट्रात ज्या ताकदीने सहकाराकडे लक्ष देण्याची गरज होती, ती दिली गेली नाही. नेता होण्यासाठी सहकाराची गरज लागते. परंतु, जेव्हा त्या संस्थांना ताकद देण्याची वेळ येते, त्यावेळी कुठलाही पुढारी पुढे येत नाही, अशी खंत भाजपचे गटनेते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.

नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशनच्यावतीने येथे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन दरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारने सहकार धोरण आणले. देशात खऱ्या अर्थाने सहकाराला केंद्राच्या माध्यमातून कधी नव्हे एवढी मदत होत आहे, याकडे लक्ष वेधत त्यांनी महाराष्ट्रातील सहकार धुरिणांच्या कार्यशैलीवर बोट ठेवले. पतसंस्थांच्या अनेक अडचणी आहेत. सहकारी संस्था चालविणे सोपे राहिलेले नाही. अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. सहकारी संस्थांना ताकद दिली पाहिजे. त्या संस्था बळकट झाल्या पाहिजेत, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारने आवश्यक त्या गोष्टी करायला हव्यात. त्यासाठी आपल्याकडून निश्चित प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दरेकर यांनी दिले. ग्रामीण-शहरी भागातील सहकारी संस्था एकत्रित येऊन सहकाराची वज्रमूठ भक्कम करणे गरजेचे आहे. सहकारी संस्थांच्या अडचणी, फेडरेशन, पतसंस्थांच्या अडचणी काय आहेत हे समजून घेऊन सर्वकष असा अहवाल राज्य सरकारला दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी आ. राहुल ढिकले, आ. सरोज अहिरे, रायगड सहकारी संघाचे मानद सचिव रामदास मोरे, शिबिराचे आयोजक सुनील ढिकले, भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार आदींसह शहरातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्वयंपुनर्विकास योजनेतून २२ इमारती

मुंबईत स्वयंपुनर्विकास योजनेच्या माध्यमातून जवळपास २०-२२ इमारती उभ्या राहिल्या आहेत. ही सहकाराची ताकद आहे. विकासक कमविणारा नफा एखादी सहकारातील जिल्हा बँक ठरवते, सरकारकडून राजाश्रय घेते. सर्वसामान्यांच्या आयुष्यात असलेले घराचे स्वप्न पूर्ण करते. तर एक पतसंस्थाही शेतकरी, सर्वसामान्यांच्या आयुष्यातही आमूलाग्र क्रांती करू शकते. राज्यात अनेक पतसंस्था आहेत. काही बँकांची उलाढाल नाही, एवढी पतसंस्थांची उलाढाल आहे. या पतसंस्था ताकदवान झाल्या पाहिजेत, यासाठी सरकारच्या माध्यमातून लागेल ती मदत केली जाईल, अशी ग्वाही दरेकर यांनी दिली.