जळगाव – हनी ट्र्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढाशी संबंध असल्याचा आरोप करून आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. आपल्या नेत्याच्या बचावासाठी भाजपचे जिल्ह्यातील आमदारही आता पुढे आले आहेत. त्यातीलच एका आमदाराची खडसे यांच्यावर टीका करताना जीभ घसरल्याने खळबळ उडाली आहे. राजकारणातील टीकेचा स्तर घसरल्याची पुन्हा एकदा प्रचिती आल्याने नागरिकांमधुनही त्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

हनी ट्रॅप प्रकरणावरून मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य करून त्यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टीकेचे बाण सोडले जात आहेत. विशेषतः राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्या विरोधात अलिकडे मोहीमच उघडली आहे. खडसे हे महाजन यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसताना, त्यांच्या वक्तव्यांचा निषेध करून भाजपचे जळगावमधील सर्व आमदार आता महाजन यांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यापैकीच एक चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार खडसे यांना लक्ष्य करतानाच त्यांच्याविषयी अपशब्द वापरले.

खडसे आणि महाजन यांच्यासारखे दोन मातब्बर नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना, जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दोन्ही नेते थांबायचे नाव घेत नसून, दररोज नवीन आरोप करताना दिसून येत आहेत. अर्थातच, दोघांच्या राजकीय जुगलबंदीमुळे नागरिकांची चांगली करमणुकही होत आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार चव्हाण यांनी मंत्री महाजन यांची बाजू घेत असताना खडसे हा मातब्बर नेता होऊच शकत नाही; तो भि*** नेता आहे, अशा एकेरी भाषेत त्यांच्यावर चाळीसगावमध्ये टीका केली. खडसे सध्या कोणतेही पुरावे नसलेली तथ्यहीन वक्तव्ये करत आहेत. अपूर्ण माहितीच्या आधारे नेत्यांची आणि जिल्ह्याची बदनामी ते करत असल्याकडेही आमदार चव्हाण यांनी लक्ष्य वेधले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खडसे आणि महाजन यांच्यातील आरोप-प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नसताना, खडसे यांना योग्य वेळ आल्यावर आरोप थांबविण्याच्या गोळ्या दिल्या जातील, असाही टोला आमदार चव्हाण यांनी हाणला. गिरीश महाजन यांनी भाजपमध्ये त्यांचे नेतृत्व कामातून सिद्ध केले आहे. त्यांची बरोबरी आपण करू शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर खडसे वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यासाठीच ते महाजन यांना उठसूठ लक्ष्य करत आहेत. जे महाजन यांना जमले, ते खडसे यांना जमले नाही. मी पणाच्या अहंकारात त्यांनी बरीच वर्षे वाया घालवली. ४० वर्षे त्यांनी स्वतःसाठी आणि परिवारासाठीच काम केले. पक्षाला ते कधीच झाले नाहीत. उलट ते पक्षातून गेल्यापासून जिल्ह्यात भाजपची एकहाती सत्ता येण्यास सुरूवात झाली, अशीही टीका आमदार चव्हाण यांनी केली.