मनसेचे टिकास्त्र; महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी
नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत गेल्या वेळी भाजपने ‘दत्तक नाशिक’ची घोषणा केली होती. तथापि, भाजपच्या सत्ताकाळात शहराची कुठलीही प्रगती झाली नाही. त्यामुळे शहरवासीयांचा भ्रमनिरास झाला असून भाजपची घोषणाही फोल ठरल्याचे टिकास्त्र मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सोडले. आगामी महापालिका निवडणुकीत कुणाचा युतीचा प्रस्ताव नाही. नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मनसेने संघटनात्मक बांधणीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. नाशिकची जबाबदारी राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्याकडे सोपविली आहे. त्या अनुषंगाने अमित ठाकरे, संदीप देशपांडे, अमेय खोपकर हे बुधवारी येथे दाखल झाले. राजगड कार्यालयावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांना सुरूवात झाली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना देशपांडे यांनी पालिकेतील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. मनसेच्या कार्यकाळात शहरात जी विकास कामे झाली, तशी कामे आधीच्या आणि नंतरच्या  कुठल्याही सत्ताधाऱ्यांना करता आली नाही. काही पक्ष एक रुपयाचे काम करतात, तर विपणन १०० रुपयांचे करतात. मनसेने १०० रुपयांची कामे केली, पण त्यांचे विपणन करू शकलो नाही. ती आमची चूक झाल्याचे नमूद करत त्यांनी भाजपला टोला लगावला. नाशिकमध्ये मनसे स्वबळावर जोरदार पुनरागमन करणार असल्याचे देशपांडे म्हणाले.

शिवसेनेने जाहिरात करून पूरग्रस्तांना मदत केली. मनसे  १०० ते १२५ मालमोटारी आपदग्रस्तांच्या मदतीसाठी  पाठवित असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.