नाशिक – सिडकोतील आयटीआय ते वावरेनगर दरम्यान सुरू असलेल्या २० कोटी रुपयांच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे झाडांच्या मुळ्या उघड्या पडून चार ते पाच वृक्ष वादळी वाऱ्यात कोसळले. या प्रकरणी वृक्षप्रेमींना भाजपशी संबंधित एका पदाधिकाऱ्याने दुरध्वनी करून धमकावल्याचे उघड झाले आहे.
वृक्षप्रेमींनी संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरत अर्ज केला होता. परंतु, त्याऐवजी भाजप पदाधिकाऱ्याने दुरध्वनी करून अश्लील भाषा वापरत अर्ज मागे न घेतल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. यासंदर्भात आमदार सीमा हिरे तसेच महेश हिरे यांच्याकडे ही तक्रार पाठविण्यात येणार असल्याचे वृक्षप्रेमींचे म्हणणे आहे. धमकी, अपहरण आणि जिवे मारण्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेत भाजपमधील अंतर्गत वादही कारणीभूत असल्याची चर्चा आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड आणि त्याविरुध्द आवाज उठविणाऱ्यांना धमक्यांमुळे लोकशाही आणि पर्यावरण सुरक्षा दोन्ही धोक्यात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
वृक्षप्रेमी सुमित शर्मा आणि अमित कुलकर्णी यांनी काही महिन्यांपूर्वी मनपा प्रशासनाला पत्र देऊन सदर झाडे तोडू नयेत, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत आजपर्यंत प्रशासनाने कुठल्याही प्रकारे झाडे तोडलेली नाहीत. यानंतरही ठेकेदाराने संबंधित सर्व झाडांची मुळे उघड्यावर पाडली आहेत. यामुळे चार ते पाच झाडे पडली. भविष्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास ठेकेदार जबाबदार राहील, अशा प्रकारचे पत्रदेखील वृक्षप्रेमींनी मनपा प्रशासनाला दिले आहे.