नाशिक : राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील घटकपक्ष थोडक्याच ठिकाणी आघाडी आणि युती म्हणून लढत आहेत. बहुसंख्य ठिकाणी महायुतीतील घटकपक्ष एकमेकांसमोर आहेत. नाशिक जिल्ह्याचा विचार करता मनमाड आणि नांदगाव येथे शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुतीतीलच राष्ट्रवादी अजित पवार गटाविरुध्द लढत आहेत. भगूरमध्ये शिवसेना शिंदे गटाविरुध्द राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप एकत्र आहेत. नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीप्रमाणेच महानगरपालिका निवडणुकीत घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्यादृष्टीने भाजपने सावधपणे पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक महापालिकेवर प्रशासक येण्याआधी महापालिकेवर भाजपचे एकहाती वर्चस्व होते. आगामी निवडणुकीतही महापालिकेवरील वर्चस्व कायम राहण्यासाठी भाजपने व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच शिवसेना ठाकरे गट, काँग्रेसमधील काही माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना गळास लावण्यात भाजपला यश आले आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर भाजपने जबाबदारी सोपविलेली असल्याने त्यादृष्टीने ते तयारी करण्यात गुंतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अलीकडेच नाशिक येथे विकास कामांच्या निमित्ताने झालेले दोन दौरे त्यासाठी पुरेसे ठरावेत. महापालिका निवडणूक महायुती म्हणून घटकपक्ष लढवतील की स्वतंत्रपणे, ते अद्याप निश्चित नाही. वरिष्ठ नेते महायुती म्हणून लढण्यावर भर देत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र स्वतंत्रपणे लढण्याचा आग्रह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आपआपल्या पक्षाकडे धरण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ऐनवेळी महायुती न झाल्यास स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आल्यास तयारीत असावे, म्हणून भाजपने प्रत्येक जागेसाठी चाचपणी केली आहे.

नाशिक महापालिकेच्या एकूण १२२ जागांसाठी भाजपकडे सोमवारपर्यंत तिप्पटपेक्षा अधिक म्हणजे ५२५ इच्छुकांचे अर्ज आले असल्याची माहिती भाजप शहरप्रमुख सुनील केदार यांनी दिली. भाजपसाठी योग्य उमेदवार कोणता राहील, याचा पक्षाकडूनही सर्व्हे करण्यात येत आहे. उमेदवार निवडीसाठी पक्षाने एक चतु:सूत्री निश्चित केली आहे. त्यात उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता, त्या प्रभागातील सामाजिक समीकरण, नागरिकांमध्ये असलेली प्रतिमा आणि पोलीस पडताळणी, यांचा समावेश आहे. याशिवाय पक्षाच्या सर्व्हेत मिळणारी माहिती महत्वाची ठरणार आहे.

नाशिक महापालिकेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच इतर लहान पक्षांमधून अनेक जण भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजपमधील निष्ठावंतांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, याची दक्षताही उमेदवार निश्चित करताना भाजपला घ्यावी लागणार आहे. नाशिकमधील वाढत्या राजकीय गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून देण्यात येणारा उमेदवार निष्कलंक असावा, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असू नये, याकडेही पक्ष जाणीवपूर्वक लक्ष देणार आहे. त्यामुळेच संभाव्य उमेदवारांची पोलिसांच्या लेखी असलेली पार्श्वभूमी तपासली जाणार आहे, अशी माहिती केदार यांनी दिली. महापालिकेसाठी महायुती झाल्यावर पक्षाच्या वाट्याला किती जागा येतील, त्यानुसार उमेदवार निश्चित केले जातील. परंतु, स्वतंत्रपणे लढण्याची वेळ आली तरी भाजप तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले.