नंदुरबार : सरदार सरोवरात बुडण्यापासून वाचविण्यासाठी तीन दिवस आणि सलग आठ तास परिश्रम घेतलेल्या नंदुरबार जिल्हा आरोग्य प्रशासनाने आता बोट रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) पॉवर ग्रीड काॅर्पोरेशनला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारीत लोकार्पण झालेल्या या जलद बोट रुग्णवाहिकेचा एकदाही उपयोग झाला नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. या रुग्णवाहिकेची देखभाल आणि पेट्रोल यासाठी वर्षाला ९८ लाख रुपयांचा खर्च येणार असल्याने इतकी रक्कम कुठून आणणार, असा प्रश्न आरोग्य प्रशासनापुढे असल्याने नाकापेक्षा नथ जड झाल्यानेच ही रुग्णवाहिका परत करण्यासाठी पत्रव्यवहार झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सामाजिक दायित्वातून पॉवर ग्रीड काॅर्पोरेशनने बोट रुग्णवाहिका जिल्हा आरोग्य प्रशासनाला दिली होती. १६ जानेवारी रोजी भाजपचे आमदार डॉ. विजयुकमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित आणि माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले होते. युरोपियन आयोगाने दिलेल्या दोन आणि इतर दोन अशा चार बोट रुग्णवाहिकांमार्फत नर्मदा काठावरील ३५ गावांच्या आरोग्याची काळजी घेतली जात होती. परंतु, युरोपियन आयोगाच्या दोन्ही रुग्णवाहिकांना जलसमाधी मिळाल्यानंतर तशाच स्वरुपातील रुग्णवाहिकांची जिल्हा आरोग्य प्रशासनाने शासनाकडे मागणी केली होती. पॉवरग्रीड कॉर्पोरेशनकडून त्याऐवजी जलद बोट रुग्णवाहिका सामाजिक दायित्वातून आरोग्य प्रशासनाला मिळाली. आधीच्या बोटी डिझेलवर चालणाऱ्या होत्या. मणिबेली ते भुशा या गावांदरम्यानचे अंतर कापण्यासाठी त्यांना आठ तास लागत होते. हेच अंतर चार तासात पूर्ण करण्याची अद्ययावत जलद बोट रुग्णवाहिकेची क्षमता होती. परंतु, त्यासाठी ताशी ७० लिटर पेट्रोल लागणार होते.

सर्व खर्चाचा ताळमेळ पाहता जलद बोट रुग्णवाहिका चालविणे आणि देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला ९८ लाख रुपये आवश्यक होते. सामाजिक दायित्वातून मिळालेली ही रुग्णवाहिका सांभाळण्यासाठी ९८ लाख रुपये कुठून आणणार, असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागापुढे उभा ठाकला. आरोग्य प्रशासनाने त्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावाही केला होता. आधीच्या डिझेलवर चालणाऱ्या बोट रुग्णवाहिकांना आठवड्याला १८ हजार रुपये खर्च येत होता. म्हणजेच अवघ्या सव्वानऊ लाखात एक बोट रुग्णवाहिका वर्षभर परिसरात सेवा देत होती. त्यापेक्षा १० पटीने अधिकचा खर्च असल्याने जलद बोट रुग्णवाहिका लोकार्पणापासूनच वापराविना पडून होती.पांढरा हत्ती ठरु पाहणारी जलद बोट रुग्णवाहिका पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनला परत करण्याचा नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

जलद बोट रुग्णवाहिका परत नेण्यासाठी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनशी पत्रव्यवहार केला आहे. तिच्याऐवजी डिझेलवर चालणाऱ्या बोट रुग्णवाहिका असल्यास देण्याची विनंती करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तशी बोट रुग्णवाहिका घेता येईल का, याची चाचपणीही केली जात आहे. सावनकुमार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार)