नाशिक : श्रावण सुरु होताच भाविकांना त्र्यंबकेश्वरजवळील ब्रम्हगिरी प्रदक्षिणेचे वेध लागतात. श्रावणातील चारही सोमवारी या प्रदक्षिणेला भाविकांची अलोट गर्दी असते. परंतु, याशिवाय ब्रम्हगिरीच्या पोटातून जाणाऱ्या मार्गानेही श्रावणी प्रदक्षिणा केली जाते. या मार्गाने जाणाऱ्यांची संख्या मात्र तुरळक असते. नाशिक येथील वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेने २९ जुलै रोजी ब्रम्हगिरी डोंगराच्या पोटातून जाणार्या मार्गाने श्रावणी प्रदक्षिणेचे आयोजन केले असून भाविकांप्रमाणेच गिरीभ्रमण करणाऱ्यांमध्ये या परिक्रमेची उत्सुकता आहे.
ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा भारतातील एक अतीप्राचीन सोहळा मानला जातो. गोदावरीचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून त्र्यंबकेश्वर येथे प्रदक्षिणा घालण्याचा प्रघात असल्याचे मानले जाते. ब्रम्हगिरीची श्रावणी प्रदक्षिणा फारच प्रसिद्ध आहे. ही प्रदक्षिणा दोन प्रकारची असते. एका प्रदक्षिणेत अंतर २० मैलांचे आणि दुसऱ्या प्रदक्षिणेत ४० मैलचे असते. स्थानिक अनेक जण ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला फेरी म्हणतात. २० मैलांची लहान प्रदक्षिणा म्हणजे गाव प्रदक्षिणा.
ही प्रदक्षिणा निवृत्तीरायांनी आपली भावंडे ज्ञानेश्वर महाराज, सोपान महाराज आणि मुक्ताबाई यांच्या समवेत केली होती, त्यावेळी त्यांच्या मागे वाघ लागल्याची आख्यायिका आहे. तिथेच मग त्यांना गहिनीनाथांनी नाथ सम्प्रदायाची दीक्षा दिल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीला येणारे लाखो वारकरी ब्रम्हगिरीची गाव प्रदक्षिणा करतात. ही प्रचलित वाटेने केली जाणारी ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा डोंगराच्या पायथ्याने केली जाते. यात कापड्या डोंगर आणि ब्रम्हगिरी यांच्या मध्ये असलेल्या गौतमाचा धस नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोंगरमार्गे प्राचीन गौतम ऋषींच्या आश्रमावरून पुढे जाणारी लहान प्रदक्षिणा नमस्कार वाडीवरून जव्हार रस्त्याने जात पूर्ण होते. मोठी प्रदक्षिणा हरिहरचा किल्ला आणि त्याचा जोत्यांचा परिसर असलेल्या पुष्करणीवरुन हर्षेवाडी, लेकुरवाळीचा घाट, सापगाव शिवारातून किकवी नदी ओलांडत जव्हार रस्त्याने जात त्र्यंबकेश्वरी पूर्ण होते.
ब्रम्हगिरी श्रावणी प्रदक्षिणेचे स्वरुप दिवसेंदिवस बदलत आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी या प्रदक्षिणेला मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यात युवावर्गाचे प्रमाण अधिक असते. तिसऱ्या सोमवारी तर गर्दी इतकी असते की अक्षरश: रेटारेटी होते. काही टवाळखोरांमुळे महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो. परिसरातील भातशेतीचेही नुकसान होते. याविषयी काही स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाकडून कायमच जनजागृती केली जाते.
वैनतेय गिर्यारोहण संस्थेचे संस्थापक जोशीकाका यांनी ब्रम्हगिरीच्या पोटातून केली जाणारी प्रदक्षिणा डोंगरभटक्यांमध्ये प्रसिद्ध केली. अनेक वर्षे ते या वाटेने भटक्यांना घेऊन जात असत. त्याच मार्गाने वैनतयने यंदा पुन्हा प्रदक्षिणेचे आयोजन केले आहे. ब्रम्हगिरीवरच्या पाचही मेटांवरून (वाड्यांवरुन) या परिक्रमेचा मार्ग असणार आहे, जांबाच्या वाडीपासून सुरुवात होऊन इंडिखिंडीची मेट, विनायक खिंड, महादरवाजाची मेट, तिथल्या रेणूकेपासून हत्ती दरवाजाचे दर्शन घेत, गौतमाचा धस या डोंगरापासून गंगा मंदिराचे दर्शन घेत गंगेची मेटमार्गे दुर्ग भांडार डोंगराच्या पायथ्याला सुपल्याच्या मेटेवरून कडेलोटाच्या कातळावरच्या प्राचीन मूर्तीचे दर्शन घेण्यात येईल. त्यानंतर गहिनीनाथाची गुहा, अनुपान शिळा, गंगाद्वाराची मेट, भातखळे आणि तिथली बारव बघत कालिकेच्या वाटेने उतरून बडा उदासी आखाडा, असे या प्रदक्षिणेचे १२.५ किलोमीटरचे अंतर असेल, अशी माहिती वैनतेयचे दुर्गप्रेमी प्रशांत परदेशी यांनी दिली.
श्रावणात उगवणार्या वनस्पती, ब्रम्हगिरीवर उगम होणाऱ्या पाच नद्या आणि अनेक झरे ओलांडत ही डोंगराच्या पोटातून जाणारी प्रदक्षिणा म्हणजे एक आदर्शवत पावसाळी भटकंतीही होऊ शकते. वैनतेयच्या वतीने दोन ते तीन वर्षातून ही डोंगराच्या पोटातील प्रदक्षिणा आयोजित केली जाते. या प्रदक्षिणा वाटेत फारशी गर्दी नसते. त्यामुळे दुर्गप्रेमी आणि निसर्गप्रेमींना ही प्रदक्षिणा वेगळा आनंद देऊन जाईल, असे प्रशांत परदेशी यांनी नमूद केले आहे.