नंदुरबार – नंदूरबार जिल्ह्यातील देवगुई घाट परिसरात अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. ही बस खोल दरीत कोसळल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ५३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. बसमध्ये ३० पेक्षा अधिक विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येते. हे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे आश्रमशाळेचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य सुरु करण्यात आले. प्रशासनाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अक्कलकुवा तालुक्यातील देवगुई घाटातील अमलीबारीजवळ हा अपघात झाला. बसमधील ३० पेक्षा अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही शालेय बस जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे अनुदानीत आश्रमशाळेची असल्याची माहिती मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि मोलगी या गावांना देवगुई घाट जोडतो. दिवाळीच्या सुट्या लागल्या की आश्रमशाळेतील विद्यार्थी आपआपल्या गावांना परततात. सुट्या संपल्याने गावावर आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत नेण्यासाठी ही बस अक्कलकुव्याच्या मोलगी परिसरात आली होती. विद्यार्थ्यांना घेवून बस अक्कलकुवाकडे परतत असताना देवगुई घाटातील अमलीबारीजवळ वाहकाचे नियंत्रण सुटल्याने बस ८० ते शंभर फुट दरीत कोसळली. त्यावेळी बसमध्ये ३५ पेक्षा अधिक विद्यार्थी होते. यातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर स्थानिकांनी दरीत जावून मदतकार्य सुरु केले. विद्यार्थ्यांना बाहेर काढले. जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे गावातील अनुदानीत आश्रमशाळेने रविवारी दोन बस विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पाठवल्या होत्या, असे सांगितले जाते. त्यापैकी एका बसचा अपघात झाला. अपघात झालेल्या या बसमध्ये मुली आणि लहान बालकांचा समावेश होता. अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने अपघातस्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरु केले आहे. या अपघाताबाबत अद्यापही पोलीस अथवा स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे जखमींचा निश्चित आकडा कळू शकत नाही.

या अपघातामुळे सातपुड्यातील घाटातील रस्त्यांची अवस्था पुन्हा चर्चेत आली आहे. या बस अपघातात नेमके कोणते कारण घडले, हे अद्याप समजलेले नसले तरी नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच घाटांमधील रस्ते खड्डेमय झाले आहेत. या घाटांची दुरुस्ती त्वरीत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत असतानाही दुर्लक्ष केले जात आहे.