सातपूर औद्योगिक वसाहतीतील ‘नाईस’ च्या बहुचर्चित आकांक्षा दोन इमारतीत प्राथमिक सोयी सुविधांच्या उपलब्धतेअभावी कोंडी झाल्याचा मुद्दा लघू उद्योजकांकडून मांडण्यात आल्यानंतर इमारतीची नियमित साफसफाई न होणे, पिण्याचे पाणी उपलब्ध न होणे, हेही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केलेल्या पाहणीत पुढे आले आहे. या इमारतीतील ४८ गाळेधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या या पाहणीत साफसफाई होत नसल्यामुळे इमारतीत प्रचंड दरुगधी पसरल्याचे आणि इमारतीत सुरक्षा यंत्रणाही पुरविली जात नसल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, दुसरीकडे नाईसने गाळेधारकांना सर्व सोई सुविधा दिल्याचा दावा करत गाळे प्रकल्पात जे उद्योजक स्वत: उद्योग करतात, त्यांची काहीही तक्रार नसल्याकडे लक्ष वेधले आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील नाशिक इंडस्ट्रिज को-ऑप. इस्टेट लिमिटेडने उभारलेल्या आकांक्षा -२ संकुलातील असुविधांबाबत दिगंबर कुडतरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली होती. नाईस ही मातृसंस्था कोणतीही मदत न करता उद्योजक कसे अडचणीत येतील, यादृष्टीने प्रयत्न करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. उद्योगासाठी प्राथमिक सुविधा अत्यावश्यक असतात. मात्र, इमारतीत लिफ्ट बंद असणे, पिण्याचे पाणी, अस्वच्छता आणि सुरक्षा रक्षकांचा अभाव या समस्या वारंवार मांडूनही नाईस प्रशासन कार्यवाही करीत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. या तक्रारीची दखल एमआयडीसीने घेऊन नाईसच्या आकांक्षा २ गाळ्याच्या इमारतीची पाहणी केली. इमारतीतील ४८ गाळ्यांची पाहणी करण्यात आली. त्यात इमारतीतील लिफ्ट बंद असल्याचे आढळून आले. पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. दिवसा सुरक्षारक्षक कायमस्वरुपी नसतो. रात्रीच्यावेळी कामगारांना परिसरातील लोक त्रास देतात. इमारतीत वेळोवेळी सफाई केली जात नाही. त्यामुळे सर्वत्र दरुगधी पसरलेली असते. या इमारतीत प्राथमिक सुविधा पुरविण्याचे काम नाईस या संस्थेमार्फत केले जाते, असे अहवालात नमूद असल्याचे एमआयडीसीने म्हटले आहे.
या अहवालाच्या आधारे एमआयडीसीने नाईसकडे विचारणा केली. त्यावर नाईसने तक्रारदार कुरतडकर यांच्या गाळ्याबाबतचा विषय मांडला. तक्रारदाराच्या गाळ्यात अवजड यंत्रणा दुसऱ्या मजल्यावर बसविली आहे. त्यासाठी १२ ते १५ फुटाचे लोखंडी पाईप लागतात. असे अवजड युनिट दुसऱ्या मजल्यावर चालविणे शक्य नाही. ते तळमजल्यावर असायला हवे. तक्रारदाराने त्यांचे गाळे भाडेतत्वावर दिले असून सदर गाळेधारक लिफ्टचा ‘मॅन्युअली’ वापर करत असल्याचे निदर्शनास आल्याचे नाईसने म्हटले आहे. गाळे प्रकल्पातील गाळेधारकांसमवेत झालेल्या बैठकीतील निर्णयांचे परिपत्रकही सर्वाना पाठविण्यात आले. प्रत्येक मजल्यावरील तीन जण व्यवस्थापनाचे काम पाहतील, त्यांची नावे संस्थेला देणे आवश्यक होते. पण, त्याची पूर्तता अद्याप झाली नाही.
संस्थेत गाळेधारकांना सर्व सोई-सुविधा देण्यात आल्या आहेत. जे उद्योजक स्वत: उद्योग करतात, त्यांची काहीच तक्रार नाही. संस्थेने सुरक्षारक्षक व इतर सोईसाठी सुरक्षारक्षक नेमले आहेत. तक्रारदाराला अडचण असल्यास ते समक्ष भेटून त्या कामगारांकडून कामे करून घेऊ शकतात. त्यामुळे संस्थेविरुध्द केलेली तक्रार मान्य नसल्याचे नाईसने म्हटले आहे. संस्थेने २००५ मध्ये गाळेधारकांना गाळ्यांचा कब्जा दिला. सर्व सोई-सुविधाही उपलब्ध करून दिल्या. त्या व्यवस्थित वापरणे गाळेधारकांची जबाबदारी होती. दहा वर्षांत कोणी तक्रार केली नाही. त्यामुळे आज प्रकल्पावरील लिफ्ट चालत नाही म्हणून तक्रार करणे संयुक्तीक नाही. उपरोक्त तक्रारीवर नाईसने आपली बाजू मांडली आहे. दरम्यान, कुरतडकर यांनी नाईसचे सर्व आरोप खोडून काढले असून आपण दुसऱ्या नव्हे तर, तिसऱ्या मजल्यावर काम करीत असून काय काम करण्यात येईल, त्याची कल्पना पूर्वीच देण्यात आली होती तसेच इतरही अनेक जणाचे तसे काम सुरू आहे. अवजड लिफ्टचा मॅन्युअली वापर करणे शक्यच नाही, असे म्हटले आहे.
या संदर्भात नाईसचे अध्यक्ष विक्रम सारडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला नसल्याने देखभालीची जबाबदारी संस्था पार पाडत असल्याचे सांगितले. नाईसच्या इतर तीन इमारतींमध्ये उद्योजकांची कोणतीही तक्रार नाही. या ठिकाणी संस्था आवश्यक त्या सर्व सुविधा देत असून उद्योग वाढीला चालना देणे हा नाईसचा उद्देश असल्याचे सारडा यांनी नमूद केले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2015 रोजी प्रकाशित
‘नाईस’ इमारतीमधील समस्यांनी उद्योजकांच्या ‘आकांक्षेवर’ पाणी
जे उद्योजक स्वत: उद्योग करतात, त्यांची काहीही तक्रार नसल्याकडे लक्ष वेधले आहे.
Written by मंदार गुरव

First published on: 16-10-2015 at 03:41 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Businessman exception has fail in nice building