लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी सायंकाळी जाहीर प्रचार संपला. शेवटच्या दिवशी प्रचार सभांचा धडाका राहिला. तसेच उमेदवारांनी शक्तीप्रदर्शनावर भर दिला. नाशिक आणि दिंडोरी मतदार संघासाठी सोमवारी मतदान होणार आहे. शनिवारी सायंकाळी जाहीर प्रचार संपला. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या भक्त परिवाराकडून गोदाकाठापासून फेरी काढण्यात आली. जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने फेरीत सामील झाला होता.

महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी सातपूर येथील स्वारबाबा नगरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सभा झाली. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारार्थ सातपूर अशोक नगर येथे सभा झाली. सायखेडा येथे दिंडोरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डाॅ. भारती पवार यांच्यासाठी पंकजा मुंडे यांची सभा झाली. मालेगाव येथे धुळे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डाॅ. सुभाष भामरे यांच्यासाठी योगी आदित्यनाथ यांची सभा झाली.

हेही वाचा >>> भाजपला आता रास्वसं नकोसे – प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया

जिल्ह्यात सभांचा धडाका सुरू असताना वेगवेगळ्या रस्त्यांवर खासगी वाहनांवर उमेदवारांचे छायाचित्र, निवडणूक चिन्ह याची माहिती देणाऱ्या दृकश्राव्य जाहिराती अखंड सुरू होत्या. मतदार संघाचा कोपरा न कोपरा ही वाहने पिंजून काढत होती. काही ठिकाणी पत्रक वाटण्यावर भर राहिला. कार्यकर्त्यांनी दुचाकी फेरी किंवा वैयक्तीक गृहभेटींवर भर दिला. मतदारांचे नाव मतदान यादीत आहे की नाही, ही माहिती देण्यासाठी कार्यकर्ते घरोघरी जावून खात्री करीत होते. भ्रमणध्वनींवरही लघुसंदेश तसेच प्रत्यक्ष फोन करत मतदान करा, असे आवाहन करत होते. सामाजिक संस्था, वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनेही पथनाट्य, फेरीच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले.

मतदान केंद्रांसंदर्भातील चिठ्ठ्यांची मतदारांना प्रतिक्षाच

दिंडोरी तसेच नाशिक लोकसभा मतदार संघासाठी ९० टक्क्यापेक्षा अधिक मतदारांना मतदार चिठ्ठी दिल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी बहुतेक ठिकाणी चिठ्ट्या पोहचलेल्या नाहीत. नाशिक मतदार संघातील नवीन नाशिक, राणेनगर, नाशिकरोड, पंचवटी, अमृतधाम, लक्ष्मीनगर परिसरता अद्याप चिठ्ठ्यांचे वाटपच झालेले नाही. प्रत्यक्ष मतदांनासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असतांना चिठ्ठी न मिळाल्याने नागरिकांकडून प्रशासनाच्या वेगवेगळ्या ॲपचा आधार घेतला जात आहे. मात्र त्यातही तांत्रिक अडचणीमुळे हे ॲप सुरू राहण्यात अडचणी येत असून काहींची नावे यादीतून गायब असल्याच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा >>> भाजपही आपल्याबरोबर – शांतिगिरी महाराजांचा दावा

गोडसे-वाजे समर्थक समोरासमोर

महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचे समर्थक आणि ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांचे समर्थक भगूर येथे शिंदे गटाचे पदाधिकारी विजय करंजकर यांच्या निवासस्थानाजवळ समारोसमोर आले. वाजे यांच्या प्रचारास करंजकर आणि गोडसे समर्थकांनी विरोध दर्शविला. दोन्ही गटात वादावादी सुरू झाल्यावर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.