जळगाव – भरधाव मोटारीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू झाला. ही घटना बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी अडावद (ता. चोपडा) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही भाऊ नवीन मोबाईल विकत घेण्यासाठी बाजारात गेले होते. घरी परत जात असताना त्यांचा अपघात झाला.
टेमऱ्या उर्फ रगन जगन बारेला (१८) आणि मगन जगन बारेला (३०, रा. वर्डी, ता. चोपडा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही भावांची नावे आहेत. दोघे सोमवारी सायंकाळी वर्डी येथून अडावद गावात नवीन मोबाईलची खरेदी तसेच बाजार करण्यासाठी गेले होते. घरी परत जात असताना त्यांच्या दुचाकीला वर्डी ते माचला फाटा दरम्यान खाकड नाल्याजवळ अडावदकडून चोपड्याकडे भरधाव वेगात जात असलेल्या मोटारीने जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीवरील मगन आणि रगन या दोन्ही भावांपैकी मगनचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी अवस्थेतील त्याचा भाऊ रगन याचा चोपडा शहरातील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मोटारीने दिलेली धडक एवढी जबरदस्त होती की बारेला बंधुंची दुचाकी महामार्गावरून थेट शेजारच्या एका शेतात जाऊन पडली होती. अपघाताची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चोपडा उपजिल्हा रूग्णालयात रवाना करून ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी आधी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. त्यानंतर अडावद पोलीस ठाण्यात सदरचा गुन्हा शून्य क्रमांकाने वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, अपघातातील मृत दोन्ही भावांपैकी मगन हा विवाहित होता, तर साखरपुडा झालेल्या रगन याचे दिवाळीनंतर लग्न होते. दोन्ही कमावत्या मुलांचा असा अपघातात मृत्यू झाल्याने बारेला कुटुंबाकडून आक्रोश करण्यात आला. यापूर्वी देखील अडावद ते चोपडा दरम्यान अनेक वेळा लहान-मोठे अपघात घडले आहेत. त्यात अनेकांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे. बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून मंजूर आहे. मात्र, भूसंपादन प्रक्रिया रखडल्याने महामार्गावरील वाहतूक कोंडी तशीच कायम आहे. याशिवाय अपघातांची मालिका सुरूच आहे. या बद्दल परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महामार्गाचे रखडलेले काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी देखील करण्यात आली. यासाठी लोकप्रतिनिधींकडूनही पाठपुराव्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.