धुळे – शहरातील बहुचर्चित गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील कक्ष क्रमांक १०२ मध्ये सापडलेल्या बेहिशेबी एक कोटी ८४ लाख ८४ हजार रुपयांचे गूढ उकलण्याच्या तपासाला गती मिळाली असून अखेर तीन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी प्राथमिक चौकशीअंती सादर केलेल्या अहवालानंतर जिल्हा अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने ही कारवाई झाली.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील विकासकामांची पाहणी करण्यासाठी विधीमंडळाच्या अंदाज समितीचे ३८ पैकी निम्मे सदस्य २१ ते २३ मे या कालावधीत दौऱ्यावर होते. गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ ही अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहायक किशोर पाटील याच्या नावावर १५ मेपासून आरक्षित करण्यात आली होती. या खोलीत पाच कोटी रुपये असून आमदारांना वाटण्यासाठी ही रोकड ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून जमा करण्यात आल्याचा आरोप २१ मे रोजी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता.
परंतु, खोली उघडून तपासणी केली असता खोलीत एक कोटी ८४ लाख ८४ हजार रुपये सापडले. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक धिवरे यांनी चौकशीचे आदेश दिले. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. पोलीस निरीक्षक पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मंत्रालयातील निलंबित कक्ष अधिकारी तथा विधिमंडळ अंदाज समितीचा स्वीय सहायक किशोर पाटील (पिंपरखेड, घनसांगवी), रामकुमार व्यंकटराव मोगले (उदगीर) आणि अन्य एक अशा तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कक्ष क्रमांक १०२ मध्ये एक कोटी ८४ लाख ८४ हजार रुपयांची रोकड मिळाली. यात १००, २०० आणि ५०० रुपयांच्या चलनी नोटा असून त्या वेगवेगळ्या नऊ कापडी पिशव्या आणि प्लास्टिक पिशव्यांमध्ये आढळल्या. एका चैन तुटलेल्या काळ्या रंगाच्या बॅगमध्ये वापरण्याचे कपडे व रामकुमार व्यंकटराव मोगले नावाचे आधारकार्ड आढळून आले. याशिवाय ओळखपत्र क्रमांक ०२३३ महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय, विधान भवन मुंबई-नागपूर असा मजकू असलेले व पासपोर्ट फोटो आणि दस्तऐवज मिळून आले.
संशयित किशोर पाटील याने चौकशी दरम्यान समाधानकारक माहिती दिलेली नाही. आणि या गुन्ह्यातील तिसऱ्या व्यक्तीविषयीही माहिती दिलेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे रामकुमार मोगले याचे आधार कार्ड आणि ओळखपत्र पोलिसांना मिळाले आहे. त्यास चौकशीसाठी बोलावण्यात आले असता तो आलाच नाही. त्याने चौकशीस सहकार्य केलेले नाही.
या ठिकाणी सापडलेली रक्कम लबाडीच्या इराद्याने संपादित करुन संशयितांनी बाळगली म्हणून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक्षकांच्या आदेशावरुन हा गुन्हा पुढील तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.