जळगाव: जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रातून लाकडांची तस्करी थांबता थांबेना. वनविभागाच्या गस्ती पथकाने मालमोटारीतून होणारी लाकडाची अवैध वाहतूक पकडत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील फैजपूर- यावल रस्त्यावर रावेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, फैजपूरचे आगार वनरक्षक सतीश वाघमारे, विनोद पाटील आदींचे पथक गस्त घालत असताना फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाजवळ मालमोटार संशयास्पद स्थितीत मिळून आली. चालक शेख अन्वर शेख कडू याची विचारपूस केली. त्याच्याकडे लाकूड वाहतुकीचा परवानाही मिळून आला नाही.
हेही वाचा… नाशिक जिल्ह्यात अजित पवार यांच्या ताफ्यावर कांदा, टोमॅटो फेक; शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड
१९ घनमीटर पंचरास प्रजातीच्या सुमारे २६ हजार ६०० रुपयांच्या जळावू लाकडासह तीन लाख ३० हजारांची किंमत असलेली मालमोटार, असा सुमारे तीन लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चालक शेख अन्वर शेख कडू (रा. खानापूर, ता. रावेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख व सहायक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी ही कारवाई केली.