नंदुरबार –  राज्यातील खासगी बाजार समित्यांना देण्यात आलेल्या परवान्यांच्या धोरणामध्ये बदल करण्याचे संकेत पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. मूल्यमापन करुन शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा देण्याखेरीज खासगी बाजार समित्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण होणार नसल्याचे रावल यांनी सांगितले. नंदुरबार येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेले मंत्री रावल यांनी खासगी बाजार समितीच्या धोरणामध्ये अमूलाग्र बदलाचे संकेत दिले.

महाराष्ट्रात अनेक खासगी बाजार समित्या सुरु असून त्यांना शासनाकडून एकदाच कायमचा परवाना देण्यात आला आहे. परंतु, या नियमात बदल करण्यात येणार आहे. आता या खासगी बाजार समित्यांना मूलभूत सुविधांची उपलब्धता करणे आवश्यक झाले आहे. मूलभूत सुविधा दिल्या नसल्यास त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण होणार नसल्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील काही ठिकाणी एकाच जिल्ह्यात आठ ते दहा खासगी बाजार समित्या आहेत. खासगी बाजार समित्यांसाठी आराखडा तयार केला जात आहे. 

महिन्याभरातच तयार करण्यात आलेल्या बांगड आणि इतर तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल येणार असून लवकरच विपणन  क्षेत्रात अमूलाग्र बदल दिसणार असल्याचे सुतोवाच मंत्री रावल यांनी केले. राज्यातील ३०५ पैकी जवळपास २०० बाजार समित्यामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. त्यासंदर्भात मागील काही दिवसात मुख्यमंत्र्यांनी बैठकीद्वारे आढावा  घेतला आहे. तसेच बाह्य किंवा  आंतरराष्ट्रीय मदतीने निधी उभारुन बाजार समितांचे रुपडे बदलण्याची देखील योजना असून आगामी काळात यातूनच मुख्यमंत्री एक तालुका एक बाजार समिती योजना देखील  कार्यान्वित करणार असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकणात मासेमारीसंदर्भात देखील सर्व सोईसुविधांयुक्त बाजारपेठ उभारण्याचे प्रयत्न असून हजार ते १२०० एकरवर विमानतळ,रेल्वे आणि बंदर यासारख्या सुविधांचा समावेश असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजार समिती देखील स्थापन केली जाणार असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. शेतकरी आपल्या शेतात माल पिकवतो. परंतु, तो विकणे त्याला कठीण झाले आहे.

शेतकऱ्याचा माल विकण्यासाठी वर्गीकरण, साठवणूक, प्रतवारी, आणि बांधणी यासारख्या गोष्टींवर देखील पणन विभागाने काम सुरु केले आहे. नागपूरच्या डोंगरी आणि भिंवडीच्या बापगावजवळ असे दोन शंभर एकरमध्ये  ॲग्रोलॉजिस्टीक पार्क निर्माण केलेजाणार असल्याची माहिती रावल यांनी दिली. यावेळी लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक खोटा प्रचार करत असल्याची टीका रावल यांनी केली.