लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: वाढत्या उन्हाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शाळांच्या वेळेत बदल केला आहे. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची वेळ एक एप्रिलपासून सकाळी सात ते दुपारी एक अशी करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिले आहेत.
उष्माघात उपाययोजनांतर्गत शाळांच्या वेळेत हा बदल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी उष्माघात उपाययोजनांसाठी स्थानिक स्तरावर करावयाच्या नियोजनाविषयी सूचना दिल्या आहेत. त्यात जळगाव जिल्हा उष्माघातप्रवण असल्याने आणि ही बाब आपत्ती या सदरात येत असल्याने यापूर्वीच विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यात आता शाळांच्या वेळेतही बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.