शाळा, महाविद्यालयांकडून गरजेनुसार आकारणी

नाशिक : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होत असतात. त्यासाठी आवश्यक असणारे परीक्षा अर्ज ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत भरण्यात येतात. जिल्ह्यात या परीक्षांचे शुल्क आकारणीत तफावत आढळून येत असल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत  आहे.

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १० वी आणि १२ वीसाठी परीक्षा शुल्क नियमानुसार मंडळाकडून ठरविण्यात येते. शुल्कात परीक्षा, प्रमाणपत्र, गुणपत्रक शुल्क आदींचा समावेश असतो. साधारणपणे मंडळाचे शुल्क हे ४५० ते ५०० रुपयांपर्यंत असते. शाळा स्तरावर मंडळाचे शुल्क अधिक स्थानिक शालेय खर्च (साधारणपणे  १५० ते २०० रुपये) मिळून शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येते. प्रत्येक शाळा, महाविद्यालयाला मंडळाच्या शुल्क व्यतिरिक्त खर्च लागतच असतो. परंतु, जिल्ह्यात बऱ्याच शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून अवाजवी शुल्क घेत असल्याची तक्रार पालकांकडून होत आहे. काही शाळा, महाविद्यालये विद्यार्थी आणि पालकांच्या आर्थिक स्थितीचे भान न ठेवता दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त शुल्क घेत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

तालुक्यातील काही मराठी माध्यमाच्या शाळा सर्रासपणे ८०० ते ९०० रुपयांपर्यंत शुल्क घेत आहेत. विशेष म्हणजे सर्वात जास्त लूट ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होत असल्याची पालकांनी तक्रार आहे. मुळात ज्या शाळांना अजून अनुदान नाही किंवा काही टप्प्यावर अनुदानित आहेत. अशा शाळांना इतर आर्थिक अनुदान मिळत नसल्याने त्यांना जादा शुल्क आकारणी नाईलाजाने करावी लागत असते. मात्र त्याही अतिशय अल्प प्रमाणात वाढीव शुल्क घेत आहेत. परंतु, अनुदान मिळत असूनही शाळा परीक्षांचे शुल्क जास्त वाढवून घेत असतील तर त्यांच्यावर लवकर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. करोनामुळे अनेकांना आर्थिक समस्या भेडसावत आहेत. त्यात जास्त करून रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात ऑनलाइन शिक्षणाचा खर्च वाढला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव दिसून आला .त्यात मागील वर्षी मंडळाची परीक्षा न झाल्याने मंडळाने त्या वर्षी घेतलेले शुल्क माफ केले असून अद्याप ते विद्यार्थ्यांना मिळालेले नाही.

शाळांकडून खुलासा मागविण्यात येईल

शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षांचे शुल्क आकारण्यात येत आहे. राज्य शिक्षण मंडळाने परीक्षा शुल्क ठरवून दिले आहे. मात्र ठरवलेल्या दरापेक्षा कोणी जास्त शुल्क आकारात असेल तर पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे थेट तक्रार अर्ज दाखल करा. पालकांच्या तक्रारींची तपासणी करून शाळांकडून खुलासा मागविण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्यात येईल.

– मच्छिंद्र कदम (माध्यमिक शिक्षणाधिकारी)