|| चारुशीला कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परिवर्तनला मूर्त स्वरुप देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरसह इतरही संघटनांची तयारी

शहराच्या मध्यवर्ती भागातील ‘त्या’ वस्तीकडे पाहण्याचा बहुतेकांचा दृष्टिकोन वेगळा. तथापि, या वस्तीची ओळख बदलण्यासाठी खुद्द वारांगनांची मानसिकता झाली आहे. त्यांच्या मन परिवर्तनाला मूर्त स्वरूप देण्याकरिता महाराष्ट्र चेंबरसह काही संघटनांनी मदतीची तयारी दर्शविली आहे. या महिलांना उद्योग क्षेत्रातून काही काम देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या समस्यांवर काम करते. संस्था या महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत त्यांची नियमित आरोग्य तपासणी करते. एचआयव्ही तसेच एड्स याशिवाय इतर दुर्धर आजार त्यांना नाही ना, यासाठी नियमित तपासणी तसेच आवश्यक औषधोपचार सुरू असतात. वारांगनांनी हा व्यवसाय सोडून रोजी रोटीसाठी अन्य पर्यायाचा अवलंब करावा, याविषयी संस्थेकडून प्रबोधन करण्यात येते.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मदतीने फिनाईल बनवणे, नीळ, अगरबत्ती, मेणबत्ती निर्मितीचे प्रशिक्षण महिलांनी घेतले. वस्तीतील वयोवृद्ध महिलांनी काही उत्पादनेही तयार केली. हा माल विकायचा कुठे आणि कसा, हा प्रश्न त्यांच्या समोर होता. वस्तीमधील ती ओळख त्यांचा पिच्छा सोडत नसल्याने त्या उत्पादनाला त्यांच्याही नकळत वस्तीचा शिक्का मारला गेल्याने त्यांचा पहिला प्रयत्न फसला. या स्थितीत प्रवरा मेडिकल ट्रस्टने महिलांनी निर्मिलेले फिनाईल आणि अन्य सामग्री दवाखान्यासाठी विकत घेतली. त्यांची मागणी अत्यल्प असल्याने नव्या बाजारपेठेचा शोध ओघाने घ्यावा लागला.

या घडामोडीत संस्थेने या महिलांसाठी अंबड औद्योगिक वसाहतीतील काही कारखान्यांशी संपर्क साधून वेष्टन तसेच जोडणीची काही कामे मिळतील का, याचा शोध सुरू केला. जेणेकरून भांडवलाशिवाय आणि बाहेर न पडता घरच्या घरी महिलेला काम करता येईल. या अनुषंगाने रोजगार कौशल्य विभागाच्या संचालकांची भेट घेण्यात आली. या अनुषंगाने महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांची प्रवराच्या समन्वयक आसावरी देशपांडे यांनी भेट घेतली.

मंडलेचा यांनी प्रवराच्या कार्यालयात जाऊन त्या महिलांशी संवाद साधला. महिलांना शिवणकामाशी संबंधित काम देण्याचे त्यांनी सुचविले आहे. पण, शिवणकामाचे कौशल्य मोजक्या काही महिलांकडे असल्याने अन्य महिलांना प्रशिक्षण देऊन प्रावीण्य मिळवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बहुतांश महिला निरक्षर असल्याने त्यांच्यासाठी अन्य काय काम देता येईल, याबाबत उद्योजकांशी चर्चा करण्याचे महाराष्ट्र चेंबरने मान्य केले.

दरम्यान, या वस्तीच्या कोलाहलापासून येथील चिमुकल्यांना दूर ठेवण्यासाठी संस्था प्रयत्न करीत असतांना १० वर्षांत बाल कल्याण समितीच्या मदतीने वस्तीतील सहा ते १४ वयोगटातील ६० पेक्षा अधिक बालके वेगवेगळ्या आश्रमशाळेत दाखल होऊन शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत.

मुक्त विद्यापीठाचे सहकार्य

कधी नाइलाजास्तव, तर कधी दुसऱ्या कामाविषयी असणारी अनभिज्ञता, समाजात असलेली नकोशी वाटणारी ओळख या कारणांमुळे या महिला हा व्यवसाय सोडण्यास टाळाटाळ करतात. सततच्या पाठपुराव्यामुळे वस्तीतील काही महिलांचे मनपरिवर्तन करण्यात संस्थेला यश मिळाले. ३० ते ५० वयोगटातील ३० महिलांनी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या मदतीने रोजगाराच्या अन्य काय संधी असतील, याची चाचपणी सुरू केली. त्याची सुरुवात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने झाली आहे.

‘त्या’ महिलांच्या पुनर्वसनाला प्राधान्य

संबंधित महिलांच्या पुनवर्सनासंदर्भात भेट घेतली आहे. त्यांचा कल, त्यांच्या क्षमता याचा विचार करता उद्योग तसेच सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने कसे होईल, त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल याचा विचार केला जाईल.  – संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charushila kulkarni marathi articles in loksatta
First published on: 12-06-2018 at 01:27 IST