नाशिक – सध्या कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षणात मागील दाराने प्रवेश दिला जात असून त्यास आपली हरकत आहे. सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र दिल्यास ते न्यायालयात टिकणार नाही. जरांगे यांना सरकारमधून वा सरकारबाहेरील कुणाकडूनही पाठबळ दिले जात असेल तर ते थांबायला हवे, अशी अपेक्षा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केली.
मनोज जरांगे हे जाहीर सभांमधून भुजबळ यांना लक्ष्य करीत आहेत. त्यावर भुजबळांनी जरांगे यांच्या कार्यपध्दतीवर बोट ठेवले. आपण काही जाळपोळ करत नाही. बेकायदा बंदूक बाळगणाऱ्या गुंडांना सोबत घेऊन फिरत नाही. जाळपोळ करणाऱ्या गुंडांना सोडा म्हणून सांगत नाही. जरांगे यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या टिकेला आपल्याकडून लोकशाही मार्गाने उत्तर दिले जाते. परंतु, या संयमाला मर्यादा असून योग्यवेळी त्यांना सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही भुजबळ यांनी दिला.
हेही वाचा >>> नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निदर्शने
गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचे म्हटले होते. त्यावर जरांगे यांनी टीका केली. जरांगे हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुणालाही आदेश देऊ शकतात, तिथे उर्वरित मंत्र्यांचे काय घेऊन बसलात, असा प्रश्न भुजबळांनी केला. ओबीसी आरक्षणात समाविष्ट घटकांविषयी जरांगे यांच्याकडून अभ्यास न करता दिशाभूल केली जात आहे. ओबीसीत भटक्या विमुक्तांना काही प्रमाणात स्वतंत्र आरक्षण दिले आहे. त्यात अन्य ओबीसी घटक जाऊ शकत नाही. ओबीसी आरक्षणाची मांडणी लक्षात न घेता, कुठलाही अभ्यास न करता जरांगे हे काहीही बोलतात, असा आरोप त्यांनी केला. जरांगे यांच्या ओबीसी आरक्षण अभ्यासाबाबत न बोललेलेच बरे, अशी खिल्ली त्यांनी उडवली. ज्या मंडल आयोगाने लहान घटकांना, भटक्या विमुक्तांना ओबीसी आरक्षण दिलेले आहे, त्याच्या संरक्षणाची जबाबदारी सर्व पक्षांची आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. पण, कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत शिरू नका, असे भुजबळ यांनी सूचित केले.