लोकसत्ता वार्ताहर
नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील राणीपूर गावाजवळ बुधवारी दुपारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बकऱ्या चारणाऱ्या १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. वनविभागाला घटनेविषयी माहिती मिळूनही ते घटनास्थळी उशिरा दाखल झाल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.
राणीपूर गावालगत अंबापूर-राणीपूर रस्त्यावर रोहित मोरे (१०) हा दोन मित्रांसह बकऱ्या चारत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने रोहित यास उसाच्या शेतात फरफटत नेले. दोन्ही मित्रांनी आरडाओरडा करत ग्रामस्थांना माहिती दिली. रोहितचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. काही ग्रामस्थांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात वन विभागाला माहिती दिली.
आणखी वाचा-भुजबळांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी, संशयितास पोलीस कोठडी
रोहित हा मावशीबरोबर शेतातील झोपडीत राहत होता. पंधरा दिवसांपूर्वी राणीपूर ग्रामस्थांनी वन विभागाला परिसरात बिबट्याचा वावर असल्याने पिंजरा लावण्याविषयी विनंती केली होती. वन विभागाने पिंजरे लावले असते तर रोहितचा बळी गेला नसता, अशी संतप्त भावना राणीपूर ग्रामस्थांनी व्यक्त केली.
बुधवारी राणीपूर ग्रामपंचायतीत महात्मा गांधी जयंती लालबहादूर जयंती असल्याने ग्रामसभा होती. या ग्रामसभेत वन विभागाला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु, वनविभागाचे अधिकारी गैरजर राहिले. बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी राणीपूर, तलावडी, इस्लामपूर, लक्कडकोट येथील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. काही ग्रामस्थांनी म्हसावद पोलीस ठाण्याला घडलेल्या घटनेसंदर्भात कळविल्यानंतर म्हसावद ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश वारुळे, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. उपस्थितांना राणीपूरचे सरपंच संतोष पावरा आणि तेथील ज्येष्ठ ग्रामस्थांनी संयमाची भूमिका घेण्याचे आवाहन केले. बिबट्याच्या हल्ल्याची माहिती दिल्यानंतर देखील विभागाचे अधिकारी व कर्मचारी तब्बल तीन तास उशिरा आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
घटनास्थळी राणीपूरचे वनक्षेत्रपाल एम. बी.चव्हाण, धडगाव येथील वनक्षेत्रपाल चारुशीला काटे, शहादा येथील वनक्षेत्रपाल शिवाजी रत्नपारखे, संजय पवार, सोनल पाटील आदी दाखल झाले होते. जिल्हा परिषदेचे सदस्य मोहन शेवाळे, डॉ.सुरेश नाईक, सामाजिक कार्यकर्ते जेलसिंग पावरा यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट दिली. मृतदेह म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात आणून डॉक्टर अल्लादिन शेख यांनी विच्छेदन केले. रात्री उशिरा नातेवाईकांकडे मृतदेह सोपविण्यात आला. या संदर्भात म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिबट्याला वन विभागाने तत्काळ जेरबंद न केल्यास तो पुन्हा अजून एखाद्याचा जीव घेईल. असे घडल्यास यास सर्वस्वी जबाबदार वनविभाग राहील. -मोहन शेवाळे (जिल्हा परिषद सदस्य, पाडळदा)
घटनास्थळ परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी चार पिंजरे लावण्यात येणार आहेत. बिबट्याचा द्रोणद्वारे शोध घेऊन त्यास लवकरात लवकर जेरबंद करू. मयत मुलाच्या परिवारास वन विभागामार्फत लवकर मदत मिळवून देऊ. -एम. बी. चव्हाण (वनक्षेत्रपाल, राणीपूर, नंदुरबार)