लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सूनपूर्व पावसात बागलाण तालुक्यात वीज पडून एका मुलाचा मृत्यू झाला. तर एक जखमी झाला. येवला शहरातील हुडको वसाहतीत घरांची भिंत कोसळून दोघे जखमी झाले. त्र्यंबकेश्वर, येवला ,निफाड, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, मालेगाव, चांदवड आदी तालुक्यात घरे, कुक्कुटपालन केंद्र आणि कांदा चाळीचे नुकसान झाले. दिंडोरी आणि बागलाण येथे पशूधनाची हानी झाली. चांदवडच्या भडाणे येथे कुक्कुटपालन केंद्र कोसळून सुमारे ३०० कोंबड्यांचा मृत्यू झाला.

वादळी वारा व पावसाने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली. बागलाण तालुक्यातील देवळाणे येथे पवन सोनवणे (१२) मुलगा अंगावर वीज पडून मयत झाला. तर एक व्यक्ती जखमी झाली. येवला शहरात हुडको वसाहतीत घराची भिंत कोसळली. त्यात दोन जण जखमी झाले. मालेगावच्या वळवाडे, कोठरे बुद्रुक, खाकुर्डी परिसरात घरांचे नुकसान झाले. त्र्यंबकेश्वर तालुक्यात काही घरांचे नुकसान झाले.

आणखी वाचा-शाहिराचे घर वाऱ्यावर; प्रशासकीय मदतीची अपेक्षा; गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्यावर टीका

धाडोशी येथील सुकरा गुंड यांच्या घराचे छप्पर कोसळले. सोमा पाडेकर यांच्या घरावर झाड पडले. वेळूंजे येथील मुकुंद उघडे यांच्या घराचे पत्रे उडून गेले. येवल्यातील मौजे ममदापूर येथील शेतकरी बाळू सदगिर यांच्या राहत्या घराचे पत्रे उडून गेले. निफाडमधील मौजे बिजोरे येथील काळू पवार आणि बापू माळी यांच्या घरावरील पत्रे उडून नुकसान झाले. सुरगाण्यातील घोडूळ येथे घराची भिंत कोसळली. इगतपुरीच्या घोटी खुर्द गावात तुळसाबाई डमाळे यांच्या घराच्या पुढील पडवीवर वीज कोसळून नुकसान झाले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मोजे वसरविहिर येथे किसन जावळे यांच्या कुक्कुटपालन केंद्राचे छत कोसळले. मालेगाव तालुक्यात वळवाणे येथे कांदा चाळ, मौजे रामपुरा येथे कुक्कुटपालन केंद्राचे शेड, मोरदर शिवारात घर व घोडेगाव शिवारात गोठ्याचे नुकसान झाले.

आणखी वाचा-नंदुरबार जिल्ह्यात वादळामुळे दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिंडोरी आणि बागलाण तालुक्यात पशुधनाची हानी झाली. इंदोरे येथील पंकज जाधव यांची एक गाय वीज पडून मयत झाली. बागलाण तालुक्यात एक बैल व तीन शेळ्या मृत्युमुखी पडल्या. दहिदी येथील मारुबाई बच्छाव यांच्या सहा शेळ्या वीज पडून मृत झाल्या. चांदवडच्या भडाणे गावात वादळाने कुक्कुटपालन केंद्र जमीनदोस्त झाले. या ठिकाणी २०० ते ३०० कोबड्यांचा मृत्यू झाला आहे. सिन्नर तालुक्यातील दुसंगे येथील दगडू ढमाले यांचा चारा व कृषिपयोगी साहित्याला वादळवारा सुरू असताना अकस्मात आग लागल्याने नुकसान झाले..