नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोरदर शिवारात ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांनी बिबट्याच्या बछड्याला मांजरीचे पिल्लू समजून तब्बल ५ दिवस त्याच्यासोबत खेळले, त्याचा सांभाळ केला. मात्र, ५ दिवसांनंतर हे मांजरीचे पिल्लू नसून बिबट्याचं बछडं असल्याचं लक्षात आलं. यानंतर या कुटुंबाने वनविभागाला संपर्क साधून बिबट्याच्या बछड्याला त्यांच्या ताब्यात दिलं. मालेगाव वनविभागाने या बछड्यावर उपचार करून त्याला नाशिक वनविभागाकडे सुपुर्द केलं आहे.

मादीपासून दुरावलेले अडीच महिन्याचे बिबट्याचे बछडे जंगलात सैरभैर फिरत होतं. फिरत फिरत हे बछडं मानवी वसाहतीजवळ आलं. त्यावेळी कृष्णा ठाकरे यांच्या कुटुंबातील चिमुकल्यांना हे बछडं दिसलं. या चिमुकल्यांनी मांजरीचे पिल्लू समजून बिबट्याच्या बछड्याला घरी आणले. तसेच बछड्याला दुध पाजून, खाऊ घालत त्याचं संगोपन व संरक्षण केलं. ५ दिवसानंतर हे बिबट्याचे बछडे असल्याचे लक्षात आले.

बछड्याला वनविभागाकडे दिल्याने कुटुंबातील चिमुकले गहिवरले

अनेक दिवस कडाक्याच्या उन्हात फिरल्याने बिबट्याच्या बछड्याला त्वचा रोग झाला. तसेच अपेक्षित अन्न पाणी न मिळाल्याने बछड्याची प्रकृती खालावली. बिबट्याचे बछडे असल्याचे लक्षात येताच ठाकरे कुटुंबियांनी बछडे वन विभागाच्या ताब्यात सुपुर्द केले. त्यावेळी कुटुंबातील चिमुकल्या सदस्यांना गहीवरुन आलं. वनविभागाने तीन दिवस उपचार करुन हे बछडे नाशिकला रवाना केले.

मोरदर शिवार जंगलात कोल्हे, हरीण, बिबट्यांसह अन्य जंगली प्राणी

काटवन परिसरातील मोरदर शिवारात जंगल आहे. या जंगलात कोल्हे, हरीण, बिबट्यांसह अन्य जंगली प्राण्यांचा वावर आहे. खाकुर्डी येथील कृष्णा ठाकरे यांचे कुटुंबीय मोरदर शिवारात वास्तव्याला आहे. शेताजवळ या कुटुंबातील मुलांना मांजरीच्या पिलासारखे गोंडस वेगळ्या रंगाचे बछडे दिसले. त्यांनी या बछड्याला घरी आणले. हे १८ ते २० जणांचे एकत्र कुटुंब आहे. या कुटुंबातील तिर्थ, वेदांत, दक्ष, अथर्व व दोन वर्षाची तनुजा या मुलांना या बछड्याचा चांगलाच लळा लागला होता.

हेही वाचा : विरारमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनखात्याला यश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी (९ मे) वन विभागाने या बछड्याला आणल्यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी त्याच्या त्वचारोगावर उपचार केले. बछडे वन विभागाकडे आल्यानंतर अन्न खात नव्हते. त्वचारोगासोबतच त्याच्यावर भूक न लागण्याचे औषधोपचारही करण्यात आले. तीन दिवसानंतर बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर मालेगाव वन विभागाने बछड्याला नाशिक वनविभागाकडे सोपविले. नाशिक येथे काही दिवस संगोपन करुन या बछड्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, अशी माहिती मालेगाव वनाधिकारी वैभव हिरे यांनी दिली.