पारंपरिक वाद्यांना ध्वनिप्रक्षेपकांची जोड, पाच मंडळांविरुद्ध गुन्हा; शुभेच्छा फलकांमधून इच्छुकांचा प्रचार

नाशिक : करोनाकाळातील र्निबधांचे सावट दूर झाल्यामुळे दोन वर्षांनंतर मंगळवारी शहर परिसरात अभूतपूर्व उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी जसे मध्यवर्ती भागातील रस्ते गर्दीने ओसंडून वाहतात, तसेच चित्र रंगपंचमीला सर्वत्र पाहावयास मिळाले. पारंपरिक रहाड असो, वा कृत्रिम वर्षां नृत्य (रेन डान्स) असो, तरूणाईने चिंब भिजून ढोल ताशांचा तालावर ताल धरला. काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांना ध्वनिप्रक्षेपकाची जोड देत अटी, शर्तीचे उल्लंघन केले. या प्रकरणी माजी महापौर विनायक पांडे यांच्या शिवसेवा युवासह पाच मंडळांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, सर्वच प्रभागांत इच्छुकांनी रंगोत्सवाचे आयोजन केले होते. झेंडे वा राजकीय फलकांना मनाई असल्याने भगवे फुगे, शुभेच्छा फलकांनी त्यांनी आपली छबी चमकावण्याची संधी सोडली नाही. शहरातील ऐतिहासिक रहाडींबरोबर वर्षां नृत्य (रेनडान्स) कार्यक्रमात पारंपरिक वाद्यांना पोलिसांनी परवानगी दिल्यामुळे रंगोत्सवाचा उत्साह दुणावला. करोनामुळे दोन वर्षे रंगपंचमी र्निबधात अडकली होती. तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शिथिल झालेल्या र्निबधांमुळे बाल गोपाळांपासून थोरा मोठय़ांपर्यंत सर्वानी दणक्यात रंगपंचमी साजरी केली. महापालिका निवडणुकीमुळे रंगोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये चांगलीच वाढ झाली. मध्यवर्ती भागात तुफान गर्दी उसळली. सांगली बँक चौक, रविवार कारंजा, शालिमार चौक,भद्रकाली, पंचवटीतील आयुर्वेद महाविद्यालयाकडून दहीपूल, मेनरोड आणि आसपासच्या भागात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर गर्दीमुळे पायी चालणेही कठीण झाले होते. युवावर्गासह अनेक जण बालगोपाळांना घेऊन रंगोत्सवात सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या दणदणाटात कोणी ठेका धरत होते. तर कुणी रहाडींत चिंब भिजण्याचा आनंद लुटला. परिसरातील वर्षां नृत्याच्या एकेका कार्यक्रमात शेकडो जण सहभागी झाले होते. मध्यवर्ती भागातील रंगोत्सवात पहिल्यांदाच इतकी गर्दी झाल्याचे चित्र होते.

मनपा निवडणुकीमुळे इच्छुकांनी प्रभागवार रंगोत्सव कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या माध्यमातून राजकीय कुरघोडीची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सार्वजनिक मंडळांना राजकीय पक्षांचे झेंडे वा जाहिरात फलक लावण्यास प्रतिबंध केला होता. त्यामुळे काही अपवाद वगळता राजकीय झेंडे दिसले नाही. ती कसर भगवे फुगे, पताक्यांनी भरून काढण्याचा काही ठिकाणी प्रयत्न झाला.

रंगोत्सवाच्या ठिकाणी इच्छुकांनी भल्यामोठय़ा फलकांद्वारे शुभेच्छा देत प्रचाराची संधी साधली. गाडगे महाराज पुतळय़ाजवळ, साक्षी गणेश मंदिरासमोरील वर्षां नृत्यात मुले, मुली एकत्रच नाचत होती. दहीपुलालगतच्या कार्यक्रमात मात्र मुला-मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.

ध्वनिप्रक्षेपकाचा वापर अंगाशी

नाशिकमधील ऐतिहासिक रहाडींसह वर्षांनृत्य (रेनडान्स) अशा सार्वजनिक रंगोत्सवात काही अटी-शर्तीसह पोलिसांनी परवानगी दिली होती. त्यात मंडळांना कर्कश आवाजाची (डीजे) ध्वनियंत्रणा, ध्वनिप्रक्षेपक वापरास बंदी होती. पारंपरिक वाद्यांच्या वापरास मुभा देण्यात आली. बहुतांश मंडळांनी अटी-शर्तीचे पालन केले. पाच मंडळांनी पारंपरिक वाद्यांबरोबर ध्वनिप्रक्षेपकाचा वापर करीत अटी-शर्तीचा भंग केला. या कारणावरून या मंडळांतर्फे परवानगीसाठी अर्ज करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या बाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी दिली. अटी-शर्तीचे पालन न करणाऱ्या मंडळांमध्ये माजी महापौर विनायक पांडे यांचे शिवसेवा युवक मित्र मंडळ (गाडगे महाराज पुतळय़ाजवळ), मेनरोडवरील प्रेरणा मित्र मंडळ, शालिमार येथील बालाजी मित्रमंडळ, साक्षी गणपती येथील नवजीवन मित्र मंडळ, बादशाही कॉर्नर येथील सत्यम सांस्कृतिक मित्र मंडळांचा समावेश आहे.