प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर झालेल्या संचलन सोहळ्यात महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या साडेतीन शक्तीपीठे नारीशक्ती या चित्ररथाने सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले. हा चित्ररथ वणी येथे गुरूवारी सकाळी ११ वाजता येणार असून यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील कर्तव्यपथावर संचलन होते. या सोहळ्यात देशातील प्रत्येक राज्य आपली कला, साहित्य, संस्कृती, नृत्य, ऐतिहासिक , लोककला अशा वेगवेगळ्या अमूल्य ठेव्याची माहिती चित्ररथाच्या माध्यमातून सादर करते.

हेही वाचा >>> नाशिक: संपामुळे कोट्यवधींचे शासकीय व्यवहार ठप्प; जिल्हा नियोजनचे निधी वितरण थांबले

यंदाही वेगवेगळ्या राज्यांनी आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून दिली. यंदाच्या संचलनात महाराष्ट्राच्या वतीने साडेतीन शक्तीपीठे असलेला नारीशक्ती चित्ररथ सादर झाला. साडेतीन शक्तीपीठांची ओळख करून देतांना देवीपुढे घालण्यात येणारा गोंधळ, जागर या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्ररथास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. साडेतीन शक्तीपीठावर आधारित चित्ररथ वणी येथील श्री सप्तश्रृंगी मंदिर देवस्थान परिसरात गुरूवारी नागरिकांना पाहता येणार आहे. सप्तश्रृंगी वणी शक्तीपीठाच्या चित्ररथाचा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. चित्ररथ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.