नाशिक – कुंभमेळ्यात साधू-महंतांसाठी साकारल्या जाणाऱ्या साधुग्रामकरिता तपोवनातील तब्बल १८०० हून अधिक झाडे तोडणे, पुनर्रोपण करणे वा फांद्यांची छाटणी करण्याविरोधात पर्यावरणप्रेमींसह नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. महापालिकेच्या नोटिसवर हरकतींचा वर्षाव करीत वृक्षतोडीवर आक्षेप घेण्यात आला. बुधवारी पर्यावरणप्रेमींनी थेट तपोवनात धाव घेतली. ज्या वृक्षांवर खूणा केल्या आहेत, तिथे चिपको आंदोलन करीत एकही झाड न तोडता प्रशासनाने जाहीर केल्यानुसार हरित कुंभाचे आयोजन करावे, अशी आग्रही मागणी केली आहे.

गोदावरी काठावर होणाऱ्या कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या साधू-महंतांच्या वास्तव्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारले जाते. साधुग्रामच्या उभारणीसाठी ही जागा मोकळी करण्यासाठी महानगरपालिकेने १८०० हून अधिक विविध प्रजातींच्या वृक्षांवर खूणा केल्या आहेत. वृक्ष तोडणे, पुनर्रोपण करणे, छाटणी याविषयी नोटीस देत हरकती व सूचना मागविल्या गेल्या. मुदत संपुष्टात येईपर्यंत २०० हून अधिक हरकती प्राप्त झाल्या असून सोमवारी किंवा मंगळवारी त्यावर सुनावणी ठेवण्याची तयारी महापालिकेने केली.

वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी व नागरिक एकवटले आहेत. मध्यंतरी महानगरपालिकेने मराठी शाळेची इमारत पाडून तिथे अलिशान विश्रामगृह उभारण्याचे नियोजन केले होते. त्याला विरोध झाल्यामुळे तो निर्णय स्थगित करावा लागला. आता साधुग्रामसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याने आंदोलनाचे सत्रही सुरू झाले आहे. तपोवनात चिन्हांकित केलेल्या झाडांमध्ये कडूनिंब, चिंच, जांभूळ आदी प्रजातींच्या अनेक जुन्या झाडांचाही समावेश आहे. ही सर्व झाडे वाचविण्यासाठी रोहन देशपांडे, राजेंद्र बागूल, राजू देसले आदींसह पर्यावरणप्रेमींनी सकाळी तपोवनात धडक देऊन चिपको आंदोलन केले.

झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा, स्वच्छ नाशिक, हरित नाशिक आदी फलक हाती घेऊन संबंधितांनी झाडांना मिठी मारून आंदोलन केले. सरकार व प्रशासन आगामी कुंभमेळ्याचे हरित कुंभमेळा म्हणून विपणन करीत आहे. साधुग्रामसाठी शेकडो झाडे तोडण्याची कृती त्या विपरित आहे. ऋुषीमुनींनी जिथे तपश्चर्या केली, तिथे प्रशासन झाडे तोडत आहे. साधू-महंत वृक्षतोडीला विरोध करतील, असा दावा आंदोलकांनी केला. प्रशासनाने एकही झाड न तोडता जाहीर केल्यानुसार हरित कुंभाचे नियोजन करावे. वृक्षतोडी संदर्भ्रात सुनावणी मनपा सभागृहात न घेता तपोवनातील खुल्या जागेत घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.