मालेगाव : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेतीन वर्षे वयाच्या चिमुकलीवर अत्याचार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या झाल्याच्या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून हा खटला ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवण्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी लक्ष वेधल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले आहेत.

गेल्या रविवारी खेळण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेली चिमुरडी घरी परतली नाही. गावकऱ्यांनी बरीच शोधाशोध केल्यावर रात्री गावालगतच्या मोबाईल टॉवर जवळील झाडाझुडुपांमध्ये तिचा मृतदेह आढळून आला होता. अत्याचार केल्यानंतर दगडाने ठेचून बालिकेची हत्या करण्यात आल्याचा संशय बळावल्याने संपूर्ण गाव हादरून गेले. दरम्यान,घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तात्काळ तपास करून गावातील रवींद्र खैरनार (२४) या संशयीताला अटक केली. क्रुरतेचा कळस गाठणाऱ्या या प्रकरणाचे मालेगाव तालुक्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले.

आरोपीला तात्काळ फासावर लटकविण्यात यावे, सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, असा आग्रह संतप्त लोकांकडून सुरू झाला. याच मागणीसाठी डोंगराळे गावातील संतप्त महिला पुरुषांनी सलग दोन दिवस मालेगाव-कुसुंबा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. मालेगावात शाळा महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून संतप्त भावना प्रकट केल्या.

डोंगराळेसह विविध गावांमध्ये या घटनेच्या निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी देखील यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. घटनेची माहिती मिळाल्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सोमवारी सकाळी डोंगराळे येथे भेट दिली. गावकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता भुसे यांनी मंगळवारी मुंबईत डोंगराळे येथील ग्रामस्थांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याप्रश्नी त्यांनी भेट घेतली.

तीव्र जनभावना व घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा, या खटल्यासाठी वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी,अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी केली. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील मंगळवारी डोंगराळे येथे जाऊन ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या. त्यांनीदेखील यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवून हीच मागणी केली. मंत्री भुसे व आमदार चव्हाण यांच्या मागणीची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री फडवणीस यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश नाशिक ग्रामीण पोलिसांना दिले आहेत.