नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी कुंभमेळा आढावा बैठकीसह मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, आरोग्य विज्ञान विद्यापीठ चक्र कक्षाचे उद्घाटन, परशुराम भवन लोकार्पण सोहळा यासह विविध कार्यक्रम झाले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रशिक्षण वर्ग नाशिकरोड येथील मित्रा संस्थेत जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कर्मचारी प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमात फडणवीस यांनी रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुगणालय मदत कक्षातील सर्वांनी गतिशीलता, पारदर्शकता आणि संवेदशनशीलतेने काम करुन समाजातील प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची रचना विश्वस्त भावनेने केली आहे. परदेशातील औद्योगिक, सामाजिक दायित्व निधी प्रमाणपत्र मिळविणारा देशातील पहिला कक्ष आहे. तुम्ही चांगले काम केले तर लोक म्हणतील मुख्यमंत्री चांगला आहे. वाईट केले तर नालायक म्हणतील. तुमचे काम महत्वाचे आहे. वर्षभराने पुन्हा येईन आणि आढावा घेईन. मी पुन्हा येतो म्हटले की येतोच. हे तुम्हाला माहिती आहे, असे फडणवीस यांनी सांगताच सभागृहात हशा उसळला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी ‘रुग्ण मित्र’ योजना मतदारसंघनिहाय सुरू करण्यात येत असल्याचे नमूद केले. सामाजिक संस्थांची फंडासाठी मदत घेणार असून केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती एका व्यासपीठावर आणण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. याठिकाणी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी हे आरोग्यदूत म्हणून काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आरोग्य विद्यापीठात उत्कृष्टता केंद्राचे भूमीपूजन
आरोग्यदृष्टया महाराष्ट्र पुढारलेला व्हावा असे वाटत असेल तर आपल्याला आरोग्य सेवेच्या रचनेवर काम करावे लागेल. आरोग्य विषयक प्राथमिक सेवा मिळविण्यासाठी मोठ्या संस्थांवर अवलंबून रहावे लागत आहे, अशी खंत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उत्कृष्टता केंद्र भूमीपूजन आणि चक्रच्या उदघाटनप्रसंगी व्यक्त केली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण करतांना प्रमुख आरोग्य संस्थांवर याचा ताण येणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. यासाठी आरोग्य विभागाला पुढील तीन वर्षाचे लक्ष्य देण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान, नवउद्यम या मुळे मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. हाच हेतु विद्यापीठाने तयार केलेल्या उत्कृष्टता केंद्राचा आहे. आगामी कुंभमेळा हा आरोग्यदायी कुंभ व्हावा, ही जबाबदारी आरोग्य विद्यापीठाचीही असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.