नाशिक – इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह अन्य भागात पाणी टंचाई जाणवत असतांना प्रशासकीय पातळीवर मात्र जलजीवन योजनेच्या माध्यमातून हर घर जल असा दावा केला जात आहे. याबाबत काही सामाजिक संस्थांच्या वतीने सातत्याने आंदोलने केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने स्थापन केलेल्या समितीने बुधवारी इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर येथे चौकशी केली असता अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले.
त्र्यंबकेश्वरसह धरणांचा परिसर असलेल्या इगतपुरी तालुक्यात एप्रिलपासून टंचाई जाणवण्यास सुरूवात झाली. हंडाभर पाण्यासाठी महिलांची होणारी पायपीट प्रशासकीय पातळीवर चर्चेचा विषय असला तरी तो टोलावला जात आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या वतीने सातत्याने आंदोलने करण्यात आली. अखेर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने समिती स्थापन करुन इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा येथील जल जीवन योजनेच्या कामांची चौकशी करण्यात येत आहे.
बुधवारी इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर येथील जल जीवन योजनेच्या कामाची चौकशी करण्यात आली. योजनेतंर्गत तीन फूट खोल जलवाहिनी टाकल्याचे सांगत देयके काढण्यात आली. वास्तविक जलवाहिनी या उघड्यावर पडलेल्या आहेत. भूजल विभागाच्या वतीने खोटे दाखले देत विहिरी खोदण्यात आल्या. त्या विहिरींना पाणी नाही.
शासनाच्या सुचनेनुसार विहीर झाल्याशिवाय टाकीचे काम करू नये, असा नियम असतांना टाकीचे काम का केले गेले, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला. सद्यस्थितीत चार पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जलजीवन योजनेच्या माध्यमातून कामे होत असल्याचा दावा प्रशासकीय पातळीवर होत असतांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की शासनावर ओढवली आहे. यावेळी पाणी पुरवठा अधिकारी देवरे, समितीप्रमुख उपअभियंता हितेश बांबोठे आणि ठेकेदार उपस्थित होते.