लोकसत्ता वार्ताहर

नंदुरबार : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी साडेअकरा ते १२ हा मुहूर्त साधण्याकरिता भाजप आणि काँग्रेस उमेदवारांची लगबग दिसून आली. भाजपच्या डॉ. हिना गावित यांनी शक्तीप्रदर्शन करुन अर्ज दाखल केला, तर, दुसरीकडे मुहूर्ताची औपचारीकता साधण्यासाठी काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी अवघ्या पाच कार्यकर्त्यांसमवेत गावित यांच्याआधीच जिल्हाधिकारी कार्यालयत पोहचले. परंतु, अर्जात काही अपूर्णता राहिल्याने त्यांचा वेळ गेला. तेवढ्या वेळात डॉ. हिना गावित यांनी अर्ज दाखल करुन बाजी मारली.

डॉ. गावित यांच्या फेरीला सकाळी १० वाजता त्यांचे निवासस्थान असलेल्या विरल विहार परिसरातून सुरुवात झाली. फेरीत १५ हजारपेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. फेरीत आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, साक्रीच्या शिंदे गटाच्या सहयोगी आमदार मंजुळा गावित, शहादा – तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, शिंदे गटाचे विधान परिषदेतील आमदार आमशा पाडवी, शिरपूरचे आमदार काशीराम पावरा आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-नाशिक : आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकात आता महिलाही

अर्ज भरण्याचा दुपारचा १२ वाजेचा मुहूर्त साधण्यासाठी हिना गावित या पाच जणांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात लगबगीने दाखल झाल्या. परंतु, २५ तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा करणारे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी हे त्यांच्याआधीच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहचले होते. त्यामुळे हिना गावित यांना बाहेर थांबावे लागले. अर्ज भरताना काही अपूर्णता राहिल्याने गोवाल यांना जिल्हाधिकारी दालनाबाहेर यावे लागले. ती संधी साधत हिना गावित या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शिरल्या. त्यामुळे गोवाल यांना काही काळ प्रतिक्षा करावी लागली. मुहूर्तासाठी घाई केली गोवाल पाडवींनी आणि मुहूर्त साधला हिना गावित यांनी,असेच काहीसे चित्र दिसून आले.

आणखी वाचा-नाशिक : चौक मंडईतील आगीत ४० पेक्षा अधिक वाहने खाक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी हिना गावित यांनी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीमधील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते जमा झाल्याचे पाहता आपल्याला विजयाचा विश्वास असल्याचे सांगितले. काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी आपण फक्त मुहूर्ताची औपचारिकता साधण्यासाठीच आज अर्ज दाखल केला असून अधिकृत अर्ज २५ एप्रिल रोजीच दाखल करणार आहोत, असे सांगितले.