नाशिक – आगामी महापालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकपक्ष स्वळाची भाषा करु लागला आहे. वरिष्ठ पातळीवरील पक्षांचे प्रमुख नेते युती आणि आघाडी म्हणूनच निवडणुकांना सामोरे जाण्याचे सांगत असले तरी स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा वेगळाच सूर आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना (उध्दव ठाकरे) मनसेबरोबर युती करुन निवडणूक लढविण्याची शक्यता असताना काँग्रेसनेही नाशिक महापालिकेसाठी स्वबळाची तयारी असल्याचे म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि महायुती प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महायुती पुन्हा एकदा सत्तेवर आली असली तरी काही मंत्र्यांवरील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप महायुतीसाठी त्रासदायक ठरले आहेत. मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीच्या आश्वासनाकडे केलेले दुर्लक्ष, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होणे, या कारणांमुळे महायुतीला घेरण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतच निवडणुकांना आघाडी म्हणून सामोरे जावे की नाही, याविषयी प्रत्येक पक्षाची वेगवेगळी भूमिका दिसून येत आहे.
ठाकरे गट आणि मनसे यांची वाढती जवळीक महाविकास आघाडीत खोडा घालू शकते. नाशिक महापालिकेसाठी मनसे आणि ठाकरे गट यांनी काही बैठका आणि आंदोलने एकत्रितपणे केल्याने किमान नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे बंधुंचे पक्ष निवडणूक एकत्रितरित्या लढविण्याची शक्यता सध्यातरी दिसत आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीत ठाकरे गटाची भूमिका काय हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेच काँग्रेसनेही स्वबळाची तयारी ठेवली आहे.
आगामी महापालिका निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्या वतीने बैठक घेण्यात आली. पक्षाकडे आतापर्यंत इच्छुकांचे ८० अर्ज प्राप्त झाले आहेत. या आठवड्यात यासंदर्भात निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. प्रभागनिहाय बैठकांचे आयोजन करुन इच्छुकांची भूमिका जाणून घेण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांच्या मुलाखतीही लवकरच घेण्याचे ठरविण्यात आले. इच्छुकांकडून येणाऱ्या अर्जांची समितीकडून छाननी करण्यात येणार आहे. ही समिती कोणत्याही इच्छुकावर अन्याय होऊ देणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई यांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे, या बैठकीत काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा दावा केला. प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव राहुल दिवे यांनी तर, सर्व जागा काँग्रेस लढवेल आणि काँग्रेसच्या मदतीशिवाय कोणाला सत्ता स्थापन करता येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. माजी नगरसेवक केशव पाटील यांनी नवीन नाशिक भागातून काँग्रेसचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. काँग्रेस स्वबळासाठी तयार असून वरिष्ठांकडून जो निर्णय घेतला जाईल, त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी सांगितले.