नाशिक : रात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे बुधवारी जिल्ह्यातील १४ धरणांमधून विसर्ग करण्यात आला. जिल्ह्यातील ११ धरणे तुडूंब झाली असून अन्य आठ धरणांची तीच स्थिती आहे. गंगापूर धरणाच्या विसर्गात मोठी वाढ होत असल्याने गोदावरी नदीची पातळी उंचावत आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गिरणा धरणात ७० टक्के जलसाठा आहे. बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असून पावसामुळे अतिरिक्त पाणी सोडावे लागत आहे.

धरण परिचालन सूचीनुसार पावसाळ्यात कोणत्या महिन्यात, किती जलसाठा असावा, हे निश्चित असते. त्यानुसार अतिरिक्त पाणी सोडावे लागते. दरवर्षी ही प्रक्रिया हंगामाच्या अखेरीस घडते. तेव्हा धरणे भरण्याच्या स्थितीत असतात. यंदा मात्र ही प्रक्रिया सुरुवातीला झाली. प्रारंभीच्या दीड महिन्यात मुसळधार पाऊस झाला. बहुतांश धरणांमध्ये तेव्हाच समाधकारक जलसाठा झाला होता. ही बाब सध्याच्या पावसात पाटबंधारे विभागासाठी आव्हानात्मक ठरली. चार, पाच धरणांचा अपवाद वगळता उर्वरित २० धरणे जवळपास भरलेली आहेत. या धरणांमध्ये पावसाचे येणारे पाणी साठविण्यासाठी आता फारशी जागा शिल्लक नाही. धरण सुरक्षित राखण्यासाठी खालील भागात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊन विसर्ग करावा लागत आहे.

बुधवारी दुपारी दारणा धरणातून १०२८४ क्युसेक, गंगापूर ४३९७, काश्यपी २५९२, मुकणे ९००, वालदेवी ५९९, आळंदी ८७, भावली २१५२, भाम ५२८३, वाघाड ५७८, तिसगाव ३१, करंजवण १३५, गौतमी गोदावरी २३००, वाकी १८६३ आणि नांदूरमध्यमेश्वरमधून १२ हजार २६० क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. विसर्गामुळे गोदावरी, दारणासह अनेक नद्या दुथडी भरून वहात आहे. नदी काठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. शहरात पूरस्थितीची शक्यता असून गोदा काठालगत बुधवारचा आठवडे बाजार थाटण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

धरणसाठा ८५ टक्क्यांवर

जिल्ह्यातील लहानमोठ्या २६ धरणांमध्ये सध्या ६० हजार ९११ दशलक्ष घनफूट म्हणजे ८७ टक्के जलसाठा आहे. कश्यपी (१८५२), गौतमी गोदावरी (१८६८), आळंदी (८१६), वाघाड (२३०२), तिसगाव (४५५), भावली (१४३४), वालदेवी (११३३), भाम (२४६४), हरणबारी (११६६), नागासाक्या (३९७) व माणिकपूंज (३३४) ही ११ धरणे तुडूंब झाली आहेत. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर (४८६५), करंजवण (४९६१), ओझरखेड (२०६१), दारणा (६५५७), मुकणे (६९७६), नांदूरमध्यमेश्वर (२५३).वाकी (२२९७), केळझर(५६२) ही ९० टक्क्यांहून अधिक असणारी आठ धरणे तांत्रिकदृष्ट्या भरलेली आहेत. त्यातून पावसाचा अंदाज घेऊन पाणी सोडले जात आहे.