नाशिक – प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येथे आदिवासी विकास भवनाच्या प्रवेशद्वारी महिन्यापेक्षा अधिक दिवस ठिय्या दिलेल्या आदिवासी आश्रमशाळांतील तृतीय आणि चतुर्थश्रेणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरूवारी भवनाच्या प्रवेशद्वारासमोर शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी शासनाची प्रतिकात्मक तिरडी काढली. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी तिरडी ताब्यात घेतली. आंदोलकांनी मध्यरात्री एक वाजेपर्यंत नियुक्तीबाबत अध्यादेश न निघाल्यास भवनात शिरण्याचा इशारा दिला आहे. आंदोलकांच्या इशाऱ्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
शासनाने बाह्यस्त्रोताद्वारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास सुरूवात केली आहे. त्याला विरोध करण्यासाठी आदिवासी आश्रमशाळा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महिन्यापेक्षा अधिक दिवसांपासून आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या दिला आहे. गुरूवारी आंदोलनाचा ३६ वा दिवस होता. शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलकांचा संयम सुटू लागला आहे.
मंगळवारी आंदोलकांनी पोलिसांना विरोध झुगारुन आदिवासी विकास भवनाच्या आवारात प्रवेश केला होता. त्यामुळे १२५ आंदोलकांवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. गुरूवारी आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाले. त्यांनी शासनाचा खासगीकरणाकडे असलेला कल तसेच बाह्यस्त्रोत नियुक्ती विरोधात सरकारची प्रतिकात्मक तिरडी तयार केली. भवनाच्या प्रवेशद्वारासमोर तिरडी तयार करुन शासनाविरोधात घोषणाबाजी सुरु केली. यावेळी तिरडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यावर आंदोलकांशी त्यांची झटापट झाली.
शासनाने किती अंत बघावा. आंदोलनास ३६ दिवस झाले. कोणीही आमच्यापर्यंत आले नाही, अशी व्यथा आंदोलकांनी मांडली. रात्री एक वाजेपर्यंत आमच्या मागण्यांविषयी निर्णय न झाल्यास आदिवासी विकास भवनात कसे शिरायचे, हे आदिवासी लोकांना शिकविण्याची गरज नाही. सरकार आमच्या कामावर, पात्रतेवर शंका घेत आहे.
४५०० लोक पात्र नाही, असे सांगतात. आमच्यापैकी ९५० हून अधिक प्राथमिक शिक्षक टीईटी, सीईटी उत्तीर्ण आहेत. अजून काय हवे, असा प्रश्नही करण्यात आला. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून आदिवासी भवनाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
आंदोलक आक्रमक का ?
मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी पायी बिऱ्हाड मोर्चाची हाक जूनमध्ये दिली होती. मोर्चा सोग्रस फाटा परिसरातून पायी नाशिकच्या वेशीवर धडकला. त्यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मोर्चा त्याच ठिकाणी स्थगित झाला. यानंतर मंत्रालय पातळीवर बैठकांचे सत्र सुरू राहिले. बैठकांमध्ये आंदोलकांच्या मागण्या बाजूला पडत राहिल्याने आंदोलकांनी पुन्हा एकदा बिऱ्हाड मोर्चाची हाक देत आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या दिला. गुरूवारी आंदोलनाचा ३६ वा दिवस होता. आतापर्यंत आंदोलकांची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, मंत्री नरहरी झिरवळ, आ. हिरामण खोसकर, आ. नितीन पवार, माजी आमदार जे. पी. गावित यांच्यासह मनसेचे दिनकर पाटील आदींनी भेट घेतली आहे. काहींनी मुंबई गाठत मनसेचे राज ठाकरे यांना साकडे घातले. सरकार आपल्या भूमिकेवर तर आंदोलकही मागण्यांवर ठाम राहिले आहेत.