नाशिक : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठा विद्या प्रसारक (मविप्र) शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी गटात सभासद याद्यांच्या मुद्यावरून वादाची ठिणगी पडली आहे. मार्च २०२२ पर्यंत वारसा सभासद यादी भ्रमणध्वनी क्रमांकासह देण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी देऊनही ती दिली जात नसल्याची तक्रार संस्थेचे माजी सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केली आहे.

 सध्या सभासदांना नाव, पत्त्यात दुरुस्तीसाठी प्रारूप यादी उपलब्ध केलेली आहे. एका खोलीत ठेवलेल्या साडेदहा हजार सभासदांच्या याद्या पाच मिनिटांत कशा पाहता येतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुरुस्तीनंतर अंतिम यादी सभासदांना दिली जाणार असल्याचा दावा सरचिटणीस डॉ. नीलिमा पवार यांनी केला आहे. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध केलेल्या सभासद याद्या कुणी तरी बळजबरीने घेऊन गेल्या असून या प्रकाराबद्दल पोलिसांत तक्रार दिली जाणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची २०२२-२७ या पंचवार्षिकासाठी निवडणूक लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर, सभासदांच्या प्रारूप याद्या नाव, पत्त्यात दुरुस्तीसाठी २५ ते २९ जून या कालावधीत पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याद्या पाहण्यासाठी तिथे एकच गर्दी होत आहे. या याद्या आभासी प्रणालीन्वये प्रसिद्ध केल्यास त्या सर्वाना सहजपणे पाहता येतील, याकडे लक्ष वेधले जात आहे. या याद्या देण्यासाठी आम्ही दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो. अखेर धर्मदाय आयुक्तांकडे दावा दाखल केला. धर्मदाय आयुक्तांनी १५ दिवसांत याद्या देण्याचे आदेश देऊनही त्या दिल्या गेल्या नसल्याची तक्रार माजी सभापती अ‍ॅड. ठाकरे यांनी केली. सोमवारी या संदर्भातील निवेदन अध्यक्षांना देण्यासाठी ते समर्थकांसह संस्था कार्यालयात पोहोचले.

संस्थाचालकांच्या कार्यपद्धतीवर सभासदांनी आक्षेप नोंदवत घोषणाबाजी केली. खोलीत ठेवलेल्या साडेदहा हजार सभासदांची यादी कुणी पाच मिनिटांत पाहू शकत नसल्याचे काहींचे म्हणणे होते. धर्मदाय आयुक्तांच्या आदेशानुसार नवीन वारसा सभासद यादी, दूरध्वनी क्रमांकासह देण्याची मागणी अ‍ॅड. ठाकरे यांनी केली. याद्या पाहण्यासाठी गर्दी होती. घोषणाबाजी आणि गर्दी झाल्यामुळे गोंधळ सुरू असताना कुणी तरी याद्या घेऊन गेले. अ‍ॅड. ठाकरे यांनी सकाळी मध्यवर्ती कार्यालयावर मोर्चा काढला. त्यांचे समर्थक बळजबरीने सभासद याद्या घेऊन गेल्याचा आरोप संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी पत्रकारांकडे केला. तथापि, त्या प्रकाराशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे अ‍ॅड. ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुळात एका खोलीत एकाच फाईलमध्ये सभासद याद्या ठेवण्याऐवजी त्या बाहेर दर्शनी भागात िभतीवर चिकटवण्याची मागणी केली होती.

सभासद याद्यांबाबत आम्ही न्यायालयाकडून रीतसर आदेश मिळवला असल्याकडे अ‍ॅड. ठाकरे यांनी लक्ष वेधले. पाहण्यासाठी उपलब्ध केलेल्या सभासद याद्या प्रारूप स्वरूपातील आहेत. सभासद त्या बघून नाव आणि पत्त्यातील दुरुस्तीसाठी अर्ज करीत आहेत. दुरुस्तीनंतर अंतिम याद्या सभासदांना उपलब्ध केल्या जाणार असताना पळवापळवीचा प्रकार घडला. याविषयी पोलिसांत तक्रार दिली जाणार असल्याचे नीलिमा पवार यांनी सांगितले.

याद्यांबाबतच्या घटना निंदनीय

निवडणुकीआधीच कागदपत्रांची पळवापळवी सुरू झाल्यामुळे पुढे काय होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरचिटणीस पदावर आपण पूर्णवेळ कामकाज करीत संस्था स्थिरस्थावर केली. संस्थेचे अंदाजपत्रक वाढले. यामुळे विरोधी गटाची चलबिचल होत आहे. संस्थेचे बहुतांश सभासद वयस्कर आहेत. अनेकांकडे आधुनिक भ्रमणध्वनी नाही. त्यामुळे आभासी यादी प्रसिद्ध केली गेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही ज्येष्ठ सभासदांनी याद्यांच्या पळवापळवीची घटना निंदनीय असल्याचे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.