नाशिक : करोनाला रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न होत असले तरी रुग्णांची संख्या झपाटय़ाने विस्तारत आहे. शनिवारी दुपापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्य़ात नवीन ११ रुग्ण आढळून आले. यातील चार नाशिक शहरातील, तर सात जण ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा १८३३ च्या घरात पोहचला आहे.
टाळेबंदी शिथील होत असतांना करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. शुकवारी नाशिक शहरात करोनाचे ३७ रुग्ण आढळले होते. शनिवारी त्यात पुन्हा चार जणांची भर पडली. अमृतधाम, साईधाम रस्ता, कालिका पेट्रोल पंपालगत आणि भाभानगर येथील हे रुग्ण आहेत. शहराची रुग्णसंख्या ६०० चा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरात आतापर्यंत ५७९ रुग्ण आढळले असून त्यातील २९ जणांचा मृत्यू झाला आहे. उपचाराअंती २१६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या ३३४ रुग्ण उपचार घेत आहेत. बाधित रुग्णांमध्ये आधीच्या रुग्णांच्या संपर्कातील अनेक जण आहेत. नव्याने सापडलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये येवल्यातील पाच, सिन्नरच्या दोडी येथील एक, लाखलगाव येथील एकाचा समावेश आहे.
जिल्ह्यात १२०१ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले असून ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ४४० रुग्ण उपचार घेत आहेत. यात मालेगाव महापालिका क्षेत्रातील ८५, तर जिल्ह्य़ाबाहेरील १४ जणांचा समावेश आहे. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ३१ रुग्ण नांदगावमध्ये, नाशिक तालुक्यात १४, चांदवडमध्ये चार, सिन्नर तीन, येवला पाच, इगतपुरी सहा, मालेगाव ग्रामीणमधील नऊ रुग्ण आहेत.
करोनामुळे माजी नगरसेवकाचा मृत्यू
करोनामुळे नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बिलाल खतीब (६२) यांचा मृत्यू झाला. खतीब हे कर्करोगाने पीडित होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर ‘केमोथेरपी’ झाली होती. करोनाची लक्षणे आढळल्याने त्यांचे नमुने घेण्यात आले. त्यांचा अहवाल सकारात्मक आला होता. खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते. शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. खतीब यांच्या कुटुंबातील २९ आणि संपर्कातील ४० अशा ६९ जणांचे विलगीकरण करण्यात आल्याचे करोना नियंत्रण कक्षाचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले. खतीब कुटुंबिय दुग्ध व्यवसायात कार्यरत आहे. बिलाल खतीब हे महापालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९२ मध्ये प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नंतरच्या निवडणुकीत ते पुन्हा नगरसेवक झाले. पुढील काळात मनसेने त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली होती.