जिल्ह्यतील एका प्रसिद्ध कवीच्या हस्ते आपल्या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाल्याचे सहन न झाल्यामुळे त्यांची पत्नी असल्याचे सांगत एका महिलेसह संशयितांनी आपली बदनामी करत घर सोडण्यासाठी दमदाटी केल्याची तक्रार इंदिरानगर पोलीस ठाण्यात करण्यात आली. या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथर्डी फाटा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या सविता पन्हाळे यांनी या प्रकरणी तक्रार दिली. पन्हाळे यांच्या ‘मनभावन’ काव्य संग्रहाचे प्रकाशन संबंधित कवीच्या हस्ते करण्यात आले होते.
हा प्रकाशन सोहळा त्यांच्या हस्ते झाल्याची बाब काहींना रुचली नाही. संबंधित कवीची पत्नी म्हणवून घेणाऱ्या महिलेसह नऊ संशयितांनी आपल्या विरोधात बदनामीची मोहीम सुरू केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रकाशन सोहळ्यानंतर आपले राहते घर आणि कार्यालय परिसरात संशयितांनी बदनामी करून गैरसमज पसरवले. आपले राहते घर व कार्यालय
सोडावे यासाठी संशयितांनी हे तंत्र अवलंबिले. इतकेच नव्हे तर, संशयितांनी शिवीगाळ व मारहाण करत घरातील स्नानगृहाच्या काचाही दगड मारून फोडल्या. या घरात तुम्ही कसे वास्तव करता, अशी धमकी संशयितांनी दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. या प्रकरणी तक्रारदाराने प्रथम तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याची दखल पोलीस यंत्रणेने घेतली नाही. अखेर तक्रारदाराने न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली. न्यायालयाने तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात निता जाधव, हेमंत सूर्यवंशी, उर्मिला हेमंत, शीतल हेमंत, मोरे, शांताराम काजळे व त्यांची पत्नी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.