नाशिक : शहरात वाढलेल्या गुन्हेगारीची झळ आता आमदारांनाही बसू लागली आहे. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्याकडे काम करणाऱ्या मोलकरणीने लाखो रुपये चोरल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
शहरात चोरी, लुटमार असे प्रकार नित्याचे झाले आहेत. वाढत्या चोऱ्यांमुळे नाशिककर हैराण झाले आहेत. सामान्यांकडून बाहेर जातांना किंवा रात्री चोरट्यांकडून हातसफाई होऊ नये यासाठी दरवाजाला अत्याधुनिक कुलूप लावणे, सीसीटीव्ही लावणे, शेजाऱ्यांना सांगून जाणे, असे उपाय करण्यात येत आहेत. उच्च मध्यमवर्गीयांकडूनही सुरक्षेवर भर दिला जात आहे. परंतु, अशी सुरक्षा यंत्रणा भेदत अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या घरी चोरी झाली.
अहिरे विधिमंडळ अधिवेशनानिमित्त मुंबईत होत्या. घरी आल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांचे पती प्रवीण वाघ (रा. कलानगर) यांनी याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत त्यांनी मोलकरीणवर संशय व्यक्त केला. ऑक्टोबर २०२४ पासून संगीता केदारे ही घरकाम करण्यासाठी त्यांच्या घरी येत आहे. सहा जुलै रोजी दुपारच्या सुमारास घरातील शयनकक्षातील कपाटात ठेवलेले एक लाख रुपये चोरीस गेले. प्रवीण यांनी कपाटात शोधाशोध केली. परंतु, पैसे सापडले नाहीत. याबाबत त्यांनी संगीताविरूध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संगीता हिला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला. संगीताने याआधीही घरातील काही मौल्यवान सामान, रोख रक्कम चोरल्याचा संशय प्रवीण यांनी व्यक्त केला.
आमदारांच्या घरी झालेल्या या चोरीचे प्रकरण चर्चेत आल्याने शहरातील गुन्हेगारी आता आमदारांच्या घरापर्यंत येऊन पोहचली असल्याचे उघड होत आहे. किमान आतातरी शहरातील सर्व आमदार वाढत्या गुन्हेगारीविषयी आवाज उठवतील, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.