कार्यकर्त्यांच्या गर्दीने वाहतुकीचा खोळंबा

मिरवणूक कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर तेथेही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने तसेच वाहने अस्ताव्यस्त उभी केल्याने झालेली वाहतूक कोंडी

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल जाणून घेण्यासाठी ग्रामीणसह शहर परिसरातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गर्दी केली होती. गर्दीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या नावावर विजयश्रीने शिक्कामोर्तब केल्यानंतर कार्यकर्त्यांनी तसेच समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून काढलेल्या मिरवणुकीने तर वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन, निदर्शनांमुळे वाहतूक कोंडी होणे नित्याचे झाले आहे. गुरुवारी सकाळी आठपासून विधान परिषदेचा निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्ते आणि समर्थकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. कार्यालयाच्या आवारात मतमोजणी सुरू असताना शिवसेनेला विजय खुणावू लागताच सकाळी १०नंतर गर्दी अधिकच वाढली. कार्यकर्त्यांची अस्ताव्यस्तपणे उभी केलेली वाहने, घोळक्याने उभे राहणे, यामुळे वाहतुकीला काही अंशी अडथळा निर्माण झाला. दराडे यांच्या नावाची विजयी उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मिरवणुकीसाठी तयारी सुरू केल्याने वाहतूक कोंडी झाली. कार्यालयीन वेळ असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे अधिकारी-कर्मचारी, मुख्य रस्त्यावरून शहरात ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्या गर्दीमुळे खोळंबा झाला. वाहतुकीचा वेग मंदावला असताना विजयी मिरवणुकीने वाहतूक व्यवस्था संपूर्णत: ठप्प झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण ढोलताशाच्या गजरात सुरू राहिली. मिरवणुकीत दराडे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतले. अशोकस्तंभ सिग्नलवरून वळण घेत शासकीय कन्या विद्यालयमार्गे सीबीएस आणि तेथून पुढे शिवाजी रोडमार्गे शालिमार येथे शिवसेना कार्यालयापर्यंत मिरवणूक गेली. हा आनंदोत्सव साधारणत: दीड ते दोन तास सुरू राहिल्याने सीबीएस ते अशोक स्तंभ येथील वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पादचाऱ्यांनाही रस्ता सापडणे मुश्कील झाले. मिरवणूक कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर तेथेही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यामुळे शालिमार परिसरातही वाहतूक खोळंबली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Crowd of party workers create traffic dilemma in nashik

ताज्या बातम्या